मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.
मनोज तिवारी म्हणाले की, या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाषिक आणि प्रांतीय एकतेचा जो भाईचारा आहे, तो मोडण्याचा प्रयत्न करणारा हा एक ‘प्राणी’ आहे. राज ठाकरेला कोणीही काहीही बोलू दे, पण जे राजकारणाच्या कचराकुंडीत गेले आहेत, त्यांना पुन्हा उचलण्याचा प्रयत्न कुणी करू नये, हीच प्रार्थना.
मनोज तिवारी म्हणाले की, राज ठाकरे आणि त्यांच्या सारखे लोक मराठी संस्कृतीचा केवळ दिखावा करतात. मात्र भारतीय जनता पार्टीच खऱ्या अर्थाने मराठी भाषेच्या अस्मितेचे जतन करते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता राज ठाकरे यांना स्वीकारत नाही. आणि जे त्यांच्या सोबत जातील, ते देखील महाराष्ट्राच्या राजकारणातून संपतील.
दुबेला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे- राज ठाकरे
उत्तर भारतात येऊन दाखवा,तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे आव्हान झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले होते. त्यावर दुबेंना प्रतिआव्हान देत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. हिंदी सक्तीचा विरोध आणि मीरा-भाईंदर येथील मनसेच्या आंदोलनानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी पेटलेत अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.

