मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. दुबे तुम मुंबई में आ जाओ… मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता दुबे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी अखेर राज ठाकरे यांना हिंदी शिकवली असे ते म्हणालेत.
राज ठाकरे यांची शुक्रवारी मीरा भाईंदर येथे सभा झाली. त्यात त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपचा दुबे नावाचा एक कोणता तरी खासदार म्हणाला, मराठी लोकांना आम्ही पटकून पटकून मारू. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनलवाल्यांनी त्यांचे चालवले का? त्याचे वक्तव्य दाखवले का? काहीही नाही. बघा हे कसे असतात. तू आ म्हाला पटक पटक के मारणार? मी दुबेला सांगतो. तुम मुंबई आ जाओ. मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे, असे राज ठाकरे म्हणाले होते.
राज यांच्या या टीकेवर निशिकांत दुबे यांनी अवघ्या एका वाक्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये मी राज ठाकरे यांना हिंदी शिकवली? अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज यांच्या विधानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे निशिकांत दुबे यांनी काही दिवसांपूर्वी मराठी – अमराठी वादात उडी घेत मराठी माणसांना उत्तर भारतात आल्यानंतर मारण्याची भाषा केली होती. त्यांनी या प्रकरणी राज व उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले होते. आपल्या घरात कुणीही सिंह असतो. पण तुमच्यात हिंमत असेल तर बिहार व उत्तर प्रदेशात या. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. महाराष्ट्राबाहेर या. तुम्हाला आपटून आपटून मारू, असे ते म्हणाले होते.
एवढेच नाही तर त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे कोणतेही योगदान नसल्याचा दावाही निशिकांत दुबे यांनी केला होता. ते वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, महाराष्ट्र कुणाच्या पैशांची भाकरी खातो? तिकडे टाटा, बिर्ला व रिलायन्स आहेत. पण त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. बिहार, झारखंड नसते तर टाटा व बिर्ला यांनी काय केले असते? टाटा , बिर्ला व रिलायन्स मुंबईत टॅक्स भरतात, पण टाटांनी पहिला कारखाना बिहारमध्ये उघडला. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो. तुम्ही कोणता टॅक्स आणता? तुमच्याकडे कारखाना नाही, उद्योग नाहीत किंवा खनिजांच्या खाणी नाहीत. सगळ्या खाणी झारखंड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश व ओडिशात आहेत. रिलायन्सची रिफायनरी व सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रात काय आहे? मग वरुन आमचे शोषण करुन दादागिरी करता, असे ते म्हणाले होते.

