मीरा-भाईंदरच्या सभेत ठाकरे यांचा इशारा
मुंबई- उत्तर भारतात येऊन दाखवा,तुम्हाला पटक-पटक के मारेंगे असे आव्हान झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले होते. त्यावर दुबेंना प्रतिआव्हान देत तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे-डुबे के मारेंगे, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. हिंदी सक्तीचा विरोध आणि मीरा-भाईंदर येथील मनसेच्या आंदोलनानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदीसाठी पेटलेत अशी टीका त्यांनी फडणवीस यांच्यावर केली.
राज ठाकरे म्हणाले, त्रिभाषा धोरणानंतर महाराष्ट्रातील वातावरण पेटलं असून सरकारला शेवटी हे धोरण मागे घ्यावं लागलं. त्यानंतर मुंबईत मराठी-हिंदी वाद पाहायला मिळाला. या वेळी त्यांनी खासदार निशिकांत दुबे यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी झारखंडचा खासदार दुबे हा आम्हाला म्हणतो की, तुम्ही आमच्याकडे येऊन दाखवा, तुम्हाला पटक पटक के मारेंगे. या खासदारावर केस झाली का? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. कारण या नेत्यांना बोलतांना माहिती असते की, सरकार आपल्या पाठिशी आहे. त्यामुळे ही अशा प्रकारची भाषा करत असतात. पण दुबे मी तुम्हाला सांगतोय की, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा. तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे.
बिहारमधील लोकाना माझं एक विचारणं आहे- २८ सप्टेंबर २०११ हिंमतनगरजवळ १४ महिन्याचा मुलीवर बलात्कार झाला. त्यानंतर बिहारी लोकांना मारहाण केली . जवळपास २० हजार लोकांना गुजरातमधून हाकलून लावले. तेव्हा तुम्हाला या घटनेच्या बातम्या दिसल्या का? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला.
या हिंदीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पेटलेत. याचे काही मला समजू शकले नाही. हिंदी कुणाचीही राजभाषा होऊ शकत नाही. हिंदी ही इकडच्या तिकडच्या भाषा मिळून २०० वर्षापूर्वी तयार झालेली भाषा आहे. हिंदीने जवळपास १५०० भाषा मारल्या. आणि आपल्या मराठीला २००० वर्षांचा इतिहास आहे. तर मग तुम्ही कोणत्या दिशेने चालला आहात? असा सवाल त्यांनी केला.

