बारामती, दि. 18: सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय व राज्य सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी 19 जुलै 2025 रोजी वाहतुकीत बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
यानुसार 19 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 किंवा स्पर्धा संपेपर्यंत शहर व परिसरातील वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
बारामती शहरातील भिगवणकडे जाणारी वाहतूक तीन हत्ती चौक-माळावरची देवी-संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग ते भिगवण रोडकडे तसेच भिगवणकडून बारामतीकडे येणारी वाहतूक डायनामिक्स कंपनी ते एअर पोर्ट रोडकडे वळविण्यात येत आहे. जळोची माळावरची देवी-मोतीबाग कडून इंदापूर रोड अशी किंवा वंजारवाडी येथील स्व. गोपीनाथ मुंडे चौक येथून डाव्या बाजुने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाने जळोची मार्गे माळावरील देवी इंदापूर रोड वळविण्यात येत आहे.
पाटस रोड-देशमुख चौकाकडून येणारी वाहतूक रेल्वे ब्रीज उतरल्यानंतर वळून रेल्वे रुळाच्या बाजूने मेहता हॉस्पीटल मार्गे महिला हॉस्पीटल मार्गे एम.आय.डी.सी.कडे वळविण्यात येत आहे. पाटस रोड पालखी महामार्गाकडून एम.आय.डी.सी.कडे जाणारी वाहतूक विमानतळाच्या बाजूचा पालखी मार्ग-रेल्वे सर्कल-नवीन पालखी मार्ग याप्रमाणे वळविण्यात येईल. भिगवण रोडकडून पाटसकडे जाणारी वाहतूक नवीन पालखी मार्ग रेल्वे सर्कल पुढे चार पदरी पालखी मार्गाने पाटस कडे वळविण्यात येत आहे.
तीन हत्ती ते पेन्सील चौक ते असा दोन्ही दोन्ही बाजूचा मुख्य मार्ग वाहतुकीकरिता बंद करण्यात येत असून मार्गाच्या दोन्ही बाजूला रहिवाशी निवासस्थाने आहेत. निवासस्थानातील नागरिकांची वाहतूक मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या सेवारस्त्याने करण्यात येत आहे.
पुणे बाजूकडून मोरगाव रोडने भिगवणकडे जाणारी वाहतूक महात्मा फुले चौकातून कारभारी सर्कलकडे न पाठवता महात्मा फुले चौकातून देशमुख चौक-सातव चौक-रेल्वे पुलाकडून डाव्या बाजूकडे मेडीकल कॉलेजकडे पाठविणेत येत आहे.
फलटण रोडकडून बारामतीकडे येणारी वाहतूक ही कारभारी सर्कलकडे न पाठविता फलटण चौकातून रिंग रोडने वाबळे हॉस्पीटल रोडकडे पाठविण्यात येत आहे.
शारदानगर अॅग्रीकल्चर कॉलेज ते कारभारी सर्कलकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत असून पर्यायी मार्ग म्हणून कॅनॉल रोडने जामदार रोडकडे वळविण्यात येत आहे.

