मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी गुरूवारी सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी कथितरित्या अश्लील हातवारेही केले होते. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सत्ताधारी बाकावरील इतरही नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जाधवांनी या प्रकरणी माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भास्कर जाधव काल पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली होती. मी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला. त्यावर संबंधित मंत्र्यांनी उत्तरे देण्याचा दंडक आहे. पण प्रस्तावावर बोलताना माझी अडवणूक करण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर दुतोंडी आहेत. ते स्वतःलाच सरकार समजतात. त्यांनी सरकार बरखास्त करून स्वतःच उत्तरे द्यावीत. ते स्वतःला ज्ञानी समजतात, असे ते म्हणाले. मंत्री शंभूराज देसाई यांनी आज हा मुद्दा सभागृहात मांडला. मंत्री देसाई म्हणाले, काल सभागृहात राईट टू रिप्लायच्या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर जाऊन पत्रकारांशी अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे करत टीका केली. यासंबंधीचे काही गंभीर व्हिडिओ आम्ही पाहिले. त्यात थेट अध्यक्षांवर आरोप होताना दिसून येत आहेत. आपल्या अनुमती असेल तर ते व्हिडिओ मी देतो. या प्रकरणी कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही. पण या सभागृहाच्या सर्वोच्च आसनावर बसलेल्या व्यक्तीविरोधात असा हेतूआरोप घेऊन असे विधान करणे हे सभागृहाचा अवमान करणारे आहे. याविषयी आज सभागृह संपण्यापूर्वी आपण निर्णय घ्यावा. अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केले तर ही प्रवृत्ती बोकाळेल. त्यानंतर यासंबंधी कोणतीही परंपरा, प्रथा, नियम, आदर राहणार नाही. या प्रकरणी संबंधितांनी माफी मागावी किंवा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी असे ते म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्यावर मला बोलायचे नव्हते. पण सभागृहाच्या आत व सभागृहाच्या बाहेर सदस्यांचे आचरण कसे असावे यासंदर्भात मी सांगायचे गरज नाही. इथे आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे केवळ सभागृहाबद्दलच त्यांची जबाबदारी नव्हे तर आपल्या मतदारसंघाप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन यापुढे आपली वर्तणूक ठेवावी. मंत्री दादा भुसे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. बाहेर पत्रकारांशी बोलताना संबंधितांनी अत्यंत अश्लील हावभाव केले, असे ते म्हणाले. मंत्री आशिष शेलार यांनीही त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यानंतर ठाकरे गटाचे गटनेते भास्कर जाधव यांनी झाल्या प्रकारावर माफी मागितली. माझ्या भाषणात मुद्दा अडथळे आणले जातात -जाधव भास्कर जाधव म्हणाले, मी सभागृहाला व आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. मला माफी मागितली पाहिजे हे नमूद करतो. काल उपमुख्यमंत्र्यांनी भाष केले. मी येथे शांतपणे बसून ऐकलो होतो. मी पूर्वी सभागृहात बसून टॉन्टिंग करत होतो. पण मागील 4-5 वर्षांपासून मी तसे करत नाही. मी सभागृहाच्या कामकाजाविषयी व नियमांविषयी आग्रही असतो. आपण पाहिले असेल की, मी सभागृहात आकांडतांडव करत नाही. कुणावर ओरडतही नाही. पण मी सभागृहात एक शब्दही बोलला तरी सत्ताधारी बाकावरून कदाचित जाणिवपूर्वक माझ्या बोलण्यात अडथळे निर्माण केले जातात. मला काहीही बोलायचे म्हटले तरी खालून इतक्या कमेंट्स होतात की, त्याला काही मर्यादा असली पाहिजे. आत्ता आपण कालच्या विषयावर येऊया. मी कबूल करतो, माझ्या इतक्या वर्षाच्या टर्ममध्ये एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेला नाही. सभागृहात केव्हाही माझ्यावर माफी मागण्याची वेळ आली नाही. पण इथे मी माफी मागावी किंवा न मागावी हे ला सांगा. पण मी बाहेर जे बोललो ते मी घरी जाऊन पाहिले त्याचा खेद मला सुद्धा वाटला. मी तसे बोलायला नको होते. मी या ठिकाणी सभागृह जेव्हा नियमाने चालावे असा आग्रह धरतो, भांडण करतो, तेव्हा माझ्याकडून अशी चूक होता कामा नये असे मला वाटते. आज आमची काही मंडळी राज्यपालांना भेटण्यासाठी गेली आहे. पण हा विषय आज सभागृहात निघणार हे मला ठावूक होते. त्यामुळे त्याकडे पाठ न फिरवता मी त्याला फेस करण्यासाठी येथे थांबलो. हो, माझ्याकडून मीडियाशी बोलताना जे शब्द गेले ते जायला नको होते. मी जाहीरपणे सांगतो, अध्यक्षांनी दिलेली कोणतीही शिक्षा मला मान्य असेल, असे भास्कर जाधव या प्रकरणी माफी मागताना म्हणाले.
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२५ Maharashtra Assembly Live | Monsoon Session 2025

