शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले
मुंबई:शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, अशा शब्दात कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले आहे. आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचे नाही, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला. काल मध्यरात्री विधिमंडळात झालेल्या गोंधळ झाल्या नंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलिस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलिस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगली जुंपली होती. रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला.
मध्यरात्री नंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आव्हाड आणि रोहित पवार समर्थकांसह पोलिस ठाण्यात पोहोचले होते. तिथे त्यांचा पोलिसांशी वाद झाला. त्या वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांना दमदाटी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झालेले दिसून येते.
विधिमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी नंतर पडळकरांच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला मध्यरात्री नंतर ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या कार्यकर्त्यांना पाहण्यासाठी आव्हाड आणि रोहित पवार थेट पोलिस ठाण्यामध्ये गेले. त्याच वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये रोहित पवार हे चांगलेच संतापलेले दिसून येतात. हात वारे करायचे नाही, सांगून ठेवतो. शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, असा आवाज या व्हिडिओमध्ये रोहित पवारांचा येत आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या आवारात भाजप आमदार गोपीचंद आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या विषयी रोहित पवार म्हणाले की, सत्तेत असलेल्या आमदारांच्या समर्थकांमध्ये आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रथम वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली. त्यांनी आरोप केला की, भाजप आमदार 4-5 गुंडांसह विधानभवनात आले होते. त्या लोकांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सुनियोजित होते, त्यांना आधीच मेसेजद्वारे धमकी देण्यात आली होती. नितीन देशमुख आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांना वाचवले. आमदार स्वतः विधानभवनात सुरक्षित नाहीत, तेव्हा इतर कोणाच्या सुरक्षिततेची हमी काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस अधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केले आहेत. तुम्ही आमच्या अंगावर गाडी चालवा पण मी गाडी खाली हळू देणार नाही, असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी बाळाचा वापर करत गाडी पुढे नेली. यावेळी आव्हाड यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली असली तरी त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. चव्हाण नावाच्या पोलिस इन्स्पेक्टरने गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना वडापाव आणून दिला. तसेच त्याला तंबाखू मळून दिली. पोलिस गुन्हेगारांना तंबाखू मळून देतात हे काय चाललेय? त्या पोलिस अधिकाऱ्याला निलंबित करा, अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे.

