पणजी–
गोव्यातील पत्रसूचना कार्यालयातर्फे (पीआयबी) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी ‘आपल्या भोवतालचे महासागर जाणून घ्या’ या संकल्पनेवर आधारित वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था(एनआयओ), राष्ट्रीय ध्रुवीय तसेच महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर) तसेच भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त सहकार्याने जुन्या गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्यसभा सदस्य सदानंद तनावडे यांच्या हस्ते झाले.

उपस्थितांना संबोधित करताना, सदानंद तनावडे यांनी वार्तालाप कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पीआयबीची प्रशंसा केली. संसद सदस्य तनावडे म्हणाले, “माध्यम प्रतिनिधी आणि सरकारी संस्था यांना एका मंचावर एकत्र आणल्याबद्दल मी पीआयबीचे अभिनंदन करतो. केंद्र सरकारी योजना, कार्यक्रम तसेच नियोजन यांची आणि केंद्र सरकारी संस्था जनता तसेच देशासाठी करत असलेल्या कामांची माहिती जनतेला देणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम हा हेतू साध्य करतात.” ते पुढे म्हणाले की अशा उपक्रमासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सामान्य लोक आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीशी संपर्क साधू शकतात.
गोवा पत्रसूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम म्हणाले की सरकारी संपर्क माध्यमे आणि माध्यम व्यावसायिक यांच्यातील संवाद आणि सहकार्याला चालना देणे हे वार्तालाप कार्यक्रमाच्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. ते म्हणाले, “वार्तालाप हा कार्यक्रम पत्रकार आणि सरकारी अधिकारी यांना सरकारी उपक्रमांशी संबंधित माहितीसंदर्भात परस्पर संवाद, चर्चा आणि स्पष्टीकरण यासाठीचा अवकाश पुरवतो. येथे आम्ही महासागराच्या संदर्भातील संशोधनात सहभागी असलेल्या एनआयओ तसेच एनसीपीओआर या प्रमुख संस्था तसेच आपल्या महासागरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे भारतीय तटरक्षक दल यांच्या सहकार्यासह हा कार्यक्रम करत आहोत. या कार्यशाळेच्या माध्यमातून माध्यमांमध्ये कार्यरत व्यक्तींना या संस्थांचे कामकाज समजून घेता येईल.”


सरकारी संपर्क माध्यमे आणि माध्यमे यांच्यातील नाते अधिक बळकट करुन माहितीचे अधिक परिणामकारक प्रसारण शक्य करणे हा वार्तालाप कार्यक्रमाचा उद्देश आहे असे ते पुढे म्हणाले.
यानंतर सीएसआयआर-एनआयओवर आधारित सत्रामध्ये मुख्य वैज्ञानिक डॉ. मंगेश गौंस यांनी या संस्थेच्या कामकाजाबद्दल चर्चा केली तसेच या संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या शास्त्रीय कार्यांची थोडक्यात माहिती दिली, तर ज्येष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.पवन देवगण यांनी ‘जैविक आणि भूगर्भीय समुद्रशास्त्र यांतील गहन विचारधन’ या संकल्पनेबाबत माहिती दिली.
एनसीपीओआरवर आधारित सत्राचे नेतृत्व डॉ.अविनाश कुमार, वैज्ञानिक ई आणि प्रकल्प वैज्ञानिक डॉ.स्वाती नागर यांनी केले. ध्रुवीय विज्ञानासंदर्भात केंद्राने केलेले कार्य त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. उप कमांडंट एन अरुण कुमार यांनी देशाचे किनारे निर्धोक आणि सुरक्षित ठेवण्यातील भारतीय तटरक्षक दलाची भूमिका विषद केली.
गोव्यातील विविध माध्यम संस्थांचे सुमारे 40 प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

