पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ‘पुणे ते शिरूर’ उन्नत पुल प्रकल्पात आता ‘फिनिक्स मॉल (हयात हॉटेल) ते खराडी जकात नाका’ हा ५ किलोमीटरचा भाग नुकताच समाविष्ट करण्यात आला आहे.
पूर्वी या भागाचा समावेश प्रकल्पातून वगळण्यात आला होता. परंतु, आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्यामुळे वळगण्यात आलेला भाग पुन्हा समाविष्ट करण्यात आला. अद्यापही या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली नसल्याने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित कामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निवेदन सादर केले.
सदर पुणे ते शिरूर उन्नत पुलामुळे पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. तसेच, वाहतूक सुरळीत होऊन नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

