स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सरकारमुळे नाही, सर्वोच्च न्यायालयामुळे लांबल्या – एकनाथ शिंदे…..एकनाथ शिंदे म्हणाले, लोकांच्या समस्यांवर अभ्यासपूर्ण प्रश्न अनेकांनी विचारले. पण काही लोकांनी फक्त आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम केले. काहींनी अर्धवट मुद्दे मांडले. जे काही असेल त्याला उत्तर देण्याचे काम माझे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने प्रशासक नेमले आहेत, त्यामुळे काम होत नसल्याचे म्हटले गेले आहे. आपण संविधान मानतो त्यानुसार आपण चौकटीत राहून काम करतो. सरकारने या निवडणुका रोखून धरल्या असे नाही. 20 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, आता निवडणुका होणर आहेत.मुंबईच्या विकासाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु, मुंबईचा विकास होत आहे. कोस्टल रोडच्या माध्यमातून आपण ते बघू शकतो. आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, काही लोकांना कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहे. मुंबईला इकनॉमिक हब करण्याचे काम सुरू आहे. मुंबई तोडण्याचे नाही तर जगाशी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत. महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही सगळे स्टे हटवले आणि वेगाने विकास कामांना सुरू केले आहे. राज्य सरकार प्रामाणिकपणे मुंबईसाठी जे काही करत आहे ते सगळ्यांसामोर आहे. काही लोक म्हणतात मराठी माणसासाठी काय केले? मी एवढेच सांगेल मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर का फेकला गेला, हे कोणामुळे गेला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत नियम 293 अन्वये सुरू असलेल्या चर्चेला उत्तर दिले….. यात त्यांनी मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर मुद्यांवरून विरोधकांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला चांगलेच खडेबोल सुनावले. मतदानाच्या आधी मराठी – मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यानंतर कोण रे तू म्हणायचे, असा प्रकार सध्या सुरू आहे, असे ते म्हणाले. डिनो मोरियाने मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
एकनाथ शिंदे आपल्या उत्तरात म्हणाले, धारावी पुनर्विकासाचा देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. तेथील 1 लाख 40 हजार झोपड्यांचे सर्वेक्षण झाले आहे. सद्यस्थितीत तेथील लोक अत्यंत वाईट स्थितीत राहतात. ते माणसे नाहीत का? या प्रकरणी सरकारवर बिल्डरच्या घशात जागा घातल्याचे आरोप होतात. ही जागा कुणाच्याही घशात घाली नाही तर डीआरपीला (धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट) दिली आहे. त्यात सरकार भागिदार आहे. त्यामुळे आपण सर्वकाही अदानींनी देतोय ही वस्तुस्थिती नाही. तेथील लोकांनाही हा प्रकल्प हवा आहे. आपण का त्याला विरोध करायचा?
आपल्याला मोठेमोठे बंगले पाहिजे. चांगली घरे पाहिजे आणि त्यांनी त्याच स्थितीत खितपत पडायचे का? तिथे चांगली घरे झाली तर तेथील जनतेचे जीवनमान उंचावेल. विरोधकांनी या नागरिकांचे जीवनमान पहावे व नंतर विरोध करावा. मतदानाच्या आधी मराठी – मराठी म्हणायचे मी आणि तू आणि निवडून आल्यानंतर मराठी माणसाला म्हणायचे कोण रे तू, असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना हाणला. अशी परिस्थिती व भूमिका आमची नाही. त्यांच्या मागे उभे राहा. त्यांना धीर द्या. हे बिल्डरसोबत साटेलोटे झालेले कुणाचे आहेत? असे शिंदे म्हणाले.
त्यांच्या या विधानावर सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी वन्स मोअरची मागणी केली. पण शिंदे आकाशवाणी एकदाच होते असे म्हणते विषय पुढे सरकवला. ते म्हणाले, स्वार्थाचा झेंडा व सत्तेचा झेंडा राबावयाचा हेच यांना (विरोधक) माहिती आहे. विजयराव (विजय वडेट्टीवार) मी तुमच्याविषयी बोलत नाही. तुम्ही समजदार आहात. ही पोरंटोरं बोलली तर समजू शकतो. पण तुम्ही विरोधी पक्षनेते व मंत्री राहिला आहात. त्यामुळे तुम्ही खोटेनाटे बोलणे सोडले पाहिजे. अरे विकासाला चालना द्या. विकासविरोधी निर्णय घेणारे कोण आहेत. आम्ही सरकारमध्ये येण्यापूर्वी मुंबई व महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प बंद होते. आम्ही त्यांना चालना दिली.
मुंबईतील बांग्लादेशी रोहिंग्यांना कुणी सुविधा व नळ कनेक्शन दिले? तेव्हा महापालिकेत कुणाची सत्ता होती? हे सगळे आहे. मी फार आरोप करणार नाही. पण आमच्यावर आरोप करतात. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेडबॉडी बॅग चोरणारे कुणावर आरोप करता? जिथे डॉक्टर व पेशंट नाहीत तेथूनही या लोकांनी पैसे काढले. रस्ते बनवणारा कंत्राटदार, कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर दिले. कुणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? असेही ते यावेळी ठाकरे गटावर टीका करताना म्हणाले.
काँक्रिटचे रस्ते झाल्यानंतर त्यावर 25 वर्षे दुरुस्तीचा खर्च नाही. दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचे पांढरे करून दुरुस्तीच्या नावाने पैसे काढण्याचे काम कोण करत होते? आम्ही डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो. तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हालाही येते. मिठी नदीतील गाळ कोण काढतंय? त्यांना मराठी माणूस दिसला नाही. तो डिनो मोरिया दिसला. आता त्या मोरियाने तोंड उघडले तर कितीतरी लोकांचा मोरया होईल. म्हणून जे काचेच्या घरात राहतात, ते दुसऱ्यांच्या घरावर दगड मारत नाहीत, असे शिंदे म्हणाले.
आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. पण विरोधकांनी आरोप करताना त्याला आधार आहे का हे तपासले पाहिजे. त्यात वस्तुस्थिती व वास्तव असले पाहिजे. असे नसेल तर विरोधी पक्ष हा केवळ विनोदी पक्ष ठरेल. ‘उम्र भर ग़ालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी आइना साफ़ करता रहा’ असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी मिर्झा गालिब यांचा शेर नमूद करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना हाणला.

