मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड व सत्ताधारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादाचे आज विधानभवन परिसरात तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे समर्थक आज सायंकाळी थेट विधानभवनाच्या लॉबीत एकमेकांना भिडले. यावेळी त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे विधिमंडळाच्या लॉबीत असणाऱ्या आमदारांत एकच घबराट पसरली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत घटनेचा अहवाल मागवला आहे. या घटनेमुळे विधानभवनातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गत आठवड्यात विधिमंडळ परिसरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहून ‘मंगळसूत्र चोर’ अशी घोषणाबाजी केली होती. यामुळे पडळकर चांगलेच संतापले होते. या घटनेला 5 दिवस लोटत नाहीत तोच बुधवारी विधान भवनाच्या गेटवर या दोन्ही नेत्यांत चांगलीच बाचाबाची झाली. त्यानंतर आज पडळकरांच्या एका समर्थकाने आव्हाड यांना मारण्याची धमकी दिली. या घटनेचे आज विधानभवनाच्या लॉबीत तीव्र पडसाद उमटले. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आज विधानभवनाच्या लॉबीत भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. अचानक झालेल्या या प्रसंगामुळे तिथे उपस्थित असणारे आमदार व पत्रकारांत एकच खळबळ माजली. हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी धावताना दिसून आले. या घटनेत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाल्याची माहिती आहे.या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांना छेडले असता त्यांनी आपला या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जितेंद्र आव्हाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते -जितेंद्र आव्हाड…. जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मी भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला कुणी केला हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील, तर आमचेच जीव सुरक्षित नाहीत. मी स्वतः ट्विट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर अजून बरेच काही लिहिले आहे. काय चालू आहे विधानसभेत?विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील, तर कशाला राहायचे आमदार? काय गुन्हा आहे आमचा? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो. त्याला ऑफिशिअल लँग्वेज म्हणून घोषित करा. असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाच आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज, असा तीव्र संताप आव्हाड आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.
हाणामारी करणाऱ्या गुंडांसह त्यांच्या पोषिंद्यांवर कारवाई करा – उद्धव ठाकरे……….शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हाणामारी करणारे समर्थक होते का गुंड होते? येथे अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यांनी या लोकांना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. शेवटी हा अधिकार अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची दिशाभूल केली गेली का? हा पण विषय आहे. पण अशी मारामारी आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी सर्व विषय सोडून या गुंडांवर व त्यांच्या पोषिंद्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. असे झाले तरच तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवण्याच्या पात्रतेचे आहात असे मी म्हणेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरीकडे, विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील आमदारांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमदार रोहित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहाला देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक याविषयी विधानसभेत बोलताना म्हणाल्या की, ही संपूर्ण घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. एक महिला म्हणून आम्ही जेव्हा आत येतो, तेव्हा आसपास अनेक पुरुष असतात. त्यातच अशी एखादी घटना घडली तर सर्वच पुरुष एकाच दिशेने धावतात. त्या स्थितीत आम्हा महिलांना कोण संरक्षण प्रदान करेल? आमच्यासोबत आमचा केवळ एक पीए असतो. तो लोकांना आवाज देऊन बाजूला करतो. पण आज ज्या वेगाने लोक आतमध्ये घुसत होते ते भयंकर होते. हे पाहून मी सभागृहाला त्याची माहिती देण्यासाठी पुन्हा परत आले. सध्या विधिमंडळ परिसरात कोणतीही शिस्त दिसून येत नाही, असे त्या म्हणाल्या.
सरकारने गंभीर दखल घेतली – आशिष शेलार…..दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतल्याची माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले, आज घडलेल्या सर्व घटनांची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे. आजची घटना विधानभवनाच्या प्रांगणात घडली आहे. सरकारला आपले काम करावेच लागेल. सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा सदस्य असला, कुणालाही धक्काबुक्की, मारहाण किंवा इतर काही झाले असेल, तर ते गंभीरच आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, असे ते म्हणाले.

