पुणे- कर्वेनगर हद्दीतील महालक्ष्मी लॉन्स – राजाराम पुल ते दुधाने लॉन्स 100 फुटी डीपी रस्ता, (शिवणे ते खराडी) लवकरच होणार असल्याचे आज स्पष्ट झाले याबाबत .
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोथरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी सांगितले कि,’आज महापालिकेचे पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासमवेत आमची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. शिवणे ते खराडी कर्वेनगर हद्दीमधील दरम्यान आपल्या प्रभागातील २ किमी रस्त्यामध्ये बाधित आणि मिसिंग लिंक जोडण्यामध्ये ज्यांच्या जमिनी बाधित होत आहेत, त्या शेतकरी बांधवांच्या सोबत सकारात्मक बैठक पार पडली.
राजाराम पूल ते दुधाने लॉन्स हा १०० फुटी डीपी रोड मिसिंग लिंकच्या माध्यमातून जोडण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. हे प्रलंबित काम पूर्णत्वास नेण्यासाठी बाधित शेतकरी बांधवांशी सुसंवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणींबाबत प्रशासनाशी चर्चा करत सरकारी मोजणी, झोनिंग, योग्य मोबदला, बाधित जमिनीच्या मोबदल्याचे प्रलंबित प्रस्ताव यावर प्रकाश टाकला. या कामांमध्ये दिरंगाई झाल्यास पुढील कामही लवकर न होण्याचा धोका संभवतो, असे निक्षुन सांगत नागरिकांच्या समस्यांचे निवारण करत येत्या सहा महिन्यात सदर रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली. यावेळी नागरिकांना आवश्यकता ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा शब्द अधिकारी वर्गाकडून आज देण्यात आला.
सन २०११ साली हा रस्ता जागेवर अस्तित्वातच नव्हता. २०१२ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून सौ. लक्ष्मी दुधाने या निवडून आल्यानंतर, पहिल्या व दुसऱ्या टर्ममध्ये शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन सदर २ किमी रस्त्यापैकी सव्वा ते दीड किमी रस्त्याचे काम आपण पूर्ण करून घेतले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडून या रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, ही खेदजनक बाब आहे. प्रशासनाने बाधित शेतकरी वर्गाशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे. याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक या दोहोंना सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, यात शंकाच नाही.
याप्रसंगी रस्ताबाधित शेतकरी बांधव – जमीन मालक विनोद बराटे, आदित्य बराटे, मांडेकर कुटुंबीय, दिलीपराव बराटे व कुटुंबीय, हेमराज चौधरी, विश्वनाथ बगाटे,जावळकर कुटुंबीय प्रभागातील सहकारी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, दत्तात्रय चौधरी तसेच अन्य नागरिक व विविध विभागाचे महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

