समोरच्या बाकाकडे पाहून हातवारे व इशारे केल्याचा आरोप; जाधवांवरही ठपका
मुंबई-विधानसभेत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे व भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर समोरच्या बाकांकडे पाहून हातवारे व इशारे करण्याचा आरोप केला. अध्यक्षांच्या बाबतीत त्यांनी केलेले विधान हे अध्यक्षांचा अवमान आहे, असे ते म्हणाले.
शंभूराज देसाई सभागृहात म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियम 293 च्या चर्चेला उत्तर देत होते. हा रिप्लाय झाल्यानंतर काही सन्माननीय सदस्य विशेषतः उबाठाचे सदस्य भास्कर जाधव यांनी राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर तुम्ही राईटली पॉइंटेडली जे काही नियम आहेत आपले, त्याचा आधार घेऊन जे स्वतः चर्चेला सुरुवात करतात त्याला राईट ऑफ रिल्पाय आहे हे नमूद केले. त्यानंतर जे झाले ते सीसीटीव्ही पाहा. अध्यक्षांनी सभागृहातील सीसीटीव्हीचे फुटेज काढावे. अध्यक्षांकडे पाहून जे हातवारे करून ते बोलले, ज्या त्वेषात ते बोलले ते पाहा. रेकॉर्डिंग असेल तर रेकॉर्डिंग काढा. आम्ही इथून ऐकले. तुम्ही रेटून कामकाज नेऊ शकत नाही. तुम्ही मनमानीने कारभार करू शकत नाही हे आम्ही ऐकले. अध्यक्षांच्या बाबतीत अशा पद्धतीचे अवमानकारक वक्तव्य करणे हा अध्यक्षांचा अवमान आहे.
हा प्रकार झाल्यानंतर ज्यांनी हा प्रस्ताव सुरू झाला ते सदस्य सभागृहात आले. ते म्हणाले की, धाडस लागते बोलायला. त्यावर आम्ही म्हणालो की, तुम्ही ऐकले असते तर तुम्हाला राईट टू रिप्लाय होता, पण माझी दुसरी विनंती आहे. उबाठाचे दुसरे आदित्य ठाकरे यांचेही सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यांनी जे हातवारे केले. समोरच्या बाकड्यांकडे पाहून त्यांनी जे इशारे केले. ते सुद्धा विधानसभेच्या नियमात बसणारे नाहीत. त्यामुळे माझी विनंती आहे की, आपण स्वतः दोन्ही सभासदांचे सभागृहातील व्हिडिओ फुटेज तपासा आणि ते जे बोलले ते पाहा. तुमच्यापुढे बसलेल्या अधिकाऱ्यांनीही कदाचित ते ऐकले असेल. त्यांच्याकडूनही माहिती घ्या. पण भास्कर जाधव यांनी आपल्याकडे जे हातवारे केले, त्यावर त्यांनी आपली माफी मागितली पाहिजे. त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना निलंबित करावे. तसेच आदित्य ठाकरे यांनीही समोरच्या बाकाकडे पाहून जे हातवारे व इशारे केले, जी दमदाटी करण्याचा प्रयत्न केले, जे अर्वाच्य शब्द वापरले. हे सगळे रेकॉर्डवर आपण तपासून पाहा व त्यांच्यावरही कारवाई करा ही सभागृहाची आपल्याला विनंती आहे.
त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आपण पुढे जाऊ असे सांगत कामकाज पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी सत्ताधारी व विरोधकांत जोरदार शाब्दिक चकमक झाली. तेव्हा नार्वेकर म्हणाले, आपले विधिमंडळ देशातील अत्यंत प्रतिष्ठित सभागृह आहे. त्यामुळे येथील कामकाज नियमानुसार व्हावे अशी अपेक्षा असते. यापू्र्वी काय झाले, ते नियमबाह्य झाले असेल तर पुन्हा ते नियमबाह्यच व्हावे अशी तुमची अपेक्षा असेल तर मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. सभागृहाच्या माहितीसाठी भास्कर जाधव यांनी उभे राहून जेव्हा राईट टू रिप्लायचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, राईट टू रिप्लाय केवळ चर्चा जो सुरू करतो त्याला असतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी यासंबंधीचा एक नियम वाचून दाखवला.
ते पुढे म्हणाले, तुमच्या मनाविरोधात एखादी गोष्ट झाली असेल, पण ती नियमबाह्यपणे निश्चितच झाली नसेल. मी भास्कर जाधव यांना एकदा नव्हे तर दोनदा संधी दिली. त्यांना नियमबाह्य कामकाज कोणते होते हे सांगावे. शेवटी अध्यक्षांवर आरोप करणे हे तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी त्यावर फार बोलू इच्छित नाही. शेवटी विधानसभेच्या अध्यक्षांचा अवमान हा सभागृहाचा अवमान असतो, असे नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर यांच्या या विधानानंतर भास्कर जाधव यांनी आम्ही काय बोललो? असा सवाल वरच्या पट्टीत केला. त्यानेही सभागृहात काहीवेळ तणाव निर्माण झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या चर्चेत हस्तक्षेप करताना म्हणाले, सत्ताधारी व विरोधक एका रथाची दोन चाके असतात. आम्ही विरोधकांना केव्हाही कमी लेखले नाही. मी अध्यक्षांचे कौतुक करतो. त्यांच्याएवढे संधी देणारे दुसरे अध्यक्ष आजवर भेटले नाही. पण बोलल्यानंतर ऐकण्याचीही तयारी पाहिजे. ती तयारी न दाखवता भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने हातवारे करून बोलत होते, ही पद्धत बरोबर होती का? हे मला सांगा. शेवटी अध्यक्षांचे महत्व आहे. या सभागृहाची एक प्रतिष्ठा आहे. पावित्र आहे. ते सर्वांनी पाळले पाहिजे. पण भास्कर जाधव नेहमीच अध्यक्षांकडे हातवारे करून बोलतात.आम्हाला निलंबित करा अशी मागणी यांनी (शंभूराज देसाई) केली नाही. तेच (भास्कर जाधव) म्हणाले हिंमत असेल. हे योग्य नाही. त्यामुळे सभागृहाचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो तो सर्वांनी पाळला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

