पुणे- विमानतळ परिसरात कचऱ्याची ११ ठिकाणे हटवण्याचे आदेश देत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाच्या सुरक्षा हद्दीत प्राणी , पक्षांचा वावर थांबवून विमान सुरक्षेसाठी विविध सूचना आज महापालिका अधिकाऱ्यांना केल्या.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विषयांसंदर्भात आज पुणे महापालिकेत एक महत्त्वाची बैठक घेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.या बैठकीस महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, विमानतळ संचालक श्री. संतोष डोके आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, भारतीय वायुदलाचे अधिकारी, वाहतूक पोलीस उपायुक्त श्री. हिम्मत जाधव, वन विभागाचे अधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून विमानतळाच्या धावपट्टीवर बिबट्याचा वावर, पक्षांची वाढलेली रेलचेल आणि विमानतळ परिसरातील वाहतूक प्रश्न असे विविध विषय प्रामुख्याने समोर आले होते. या सर्व विषयांवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त, विमानतळाच्या विविध विभागांचे अधिकारी, हवाई दलाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्या समवेत बैठकीत वरील सर्व विषय सोडवण्यासाठी त्यांनी सूचित केले. विमानतळ परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात पिंजरे जाळ्या लावण्यात आले असून बिबट्या ज्या ठिकाणाहून परिसरात प्रवेश करतो किंवा लपून बसतो, त्या ठिकाणी प्रतिबंध लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या . शिवाय विमानतळ परिसरात कचऱ्याचे विविध ११ ठिकाणे निदर्शनास आले असून त्या ठिकाणची स्वच्छता करून पक्षांचा वावर थांबवण्याचा प्रयत्न आहे. कोणत्याही परिस्थितीत प्राणी आणि पक्षांसाठी विमानतळ परिसरात खाद्य उपलब्ध होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले आहेत. महत्वाची बाब म्हणजे परिसरात होणारे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष खबरदारी आणि कृती आराखडा करण्याचेही सूचित केले असून त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे. विमानांच्या ये-जा करण्यासाठी कोणती अडचण येऊ नये, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असून विमानांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि त्या दृष्टीने उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश देऊन, त्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मोहोळ यांनी दिले आहेत.

