मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील अर्धा तास चर्चा सत्रात काल (ता. १५) आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे शहरातील शाळा सुरक्षा व स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले.
“पुणे शहरात हजारो शाळा आहेत. मात्र आकडेवारीनुसार केवळ २००० शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित १०००-१५०० शाळांमध्ये अद्याप ही सुविधा उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे असून अशा शाळांमध्ये तातडीने सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश सरकार देईल का?” असा थेट सवाल त्यांनी सभागृहात केला.
याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील स्वच्छता व मनुष्यबळाचा प्रश्नही त्यांनी मांडला. ते म्हणाले, “महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी पुरेसे कर्मचारी नाहीत. परिणामी अस्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तसेच, अनेक शाळांमध्ये शिपायांचीही कमतरता आहे. त्यामुळे या शाळांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल का?”
या प्रश्नांवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. “ज्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवलेले नाहीत, त्या शाळांमध्ये ही सुविधा लवकरात लवकर पुरवली जाईल. तसेच, शौचालय स्वच्छतेबाबत आणि मनुष्यबळ पुरवठ्याबाबतही महानगरपालिकेला आवश्यक त्या सूचनाही देण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले.

