पुणे, दि. 16: जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करण्याचे निश्चित करण्यात आलेल्या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी त्या त्या क्षेत्रात मोठ्या स्वरुपाचे प्रशिक्षण आयोजित करावे. संबंधित पिकांसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण भविष्यात या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा कृषी उन्नतीची – 2029 अभियान आणि ‘ॲग्री हॅकॅथॉन’ बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, दिशा कृषी उन्नतीची-2029 या पंचवार्षिक अभियानात निश्चित केल्यानुसार फळपिके तसेच इतर पिकांच्या लागवडीचे लक्ष्यांक गाठणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. प्रशिक्षणाद्वारे जनजागृती, अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेणे, त्या त्या भागात प्रक्रिया उद्योग उभारणे, जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना बाजारपेठ, योग्य बाजारभाव मिळेल याची खात्री देणे आदी प्रयत्न करावेत.
इंदापूर, बारामती येथे केळी, सूर्यफूल, पुरंदर येथे अंजीर, सिताफळ, जुन्नर येथे आंबा, केळी, स्ट्रॉबेरी पिकांचे प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी गरजेप्रमाणे पाणी फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग घ्यावा. मास्टर ट्रेनर्स हे इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांच्या लागवडीसाठी पुढे येतील.
प्रक्रिया प्रकल्प तसेच अन्य बाबींसाठी निधी विविध योजनांच्या अभिसरणातून (कन्व्हर्जन्स) मिळण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रयत्न करावेत. तसेच अतिरिक्त निधीची गरज कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर), बँकेमार्फत वित्तपुरवठा तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी देऊन पुरविण्यात येईल. प्रकल्पांसाठी दाखल केलेले प्रकल्पांचे कर्ज गतीने मंजूर व्हावे यासाठी बँकांसोबत बैठक लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.
जागतिक स्तरावर अनेक देशात भव्य कृषी प्रदर्शने आयोजित केले जातात. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली दालने लावावीत तसेच आपल्या कृषी आधारित उत्पादनांना नवीन बाजारपेठा शोधाव्यात, असेही ते म्हणाले.
जूनमध्ये झालेल्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या 16 नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उपक्रम प्रत्यक्षात निर्मिती होऊन बाजारपेठेत विक्रीला येण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत पुरविण्यासाठी बाँबे चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या स्टार्टअपला आयमॅटसारख्या संस्थांनी तांत्रिक, व्यावसायिक मार्गदर्शनासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतापर्यंत जात आहे, त्याचेही संनियंत्रण करावे. पुढील हॅकॅथॉनची तयारी नियोजित वेळेत होईल तसेच त्यात अधिक अचूकता, नवीन बाबी कशा घेता येतील या अनुषंगानेही सूचना कराव्यात आदी सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.
यावेळी श्री. काचोळे यांनी सादरीकरण करुन क्लस्टर पद्धतीने लागवड करण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीबाबत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली. श्री. मडके यांनी प्रशिक्षण तसेच शेतकरी अभ्यासदौरे आदींच्या अनुषंगाने माहिती दिली.
0000

