पुणे : भागवत महापुराणातील मंगलाचरणाच्या पहिल्या चरणात भक्तिभावाने भगवंतास वंदन करून त्याला समर्पित होण्याचा संदेश दिला आहे. दुसऱ्या चरणात सृष्टीच्या उत्पत्तीपासून ब्रह्मज्ञान, आत्मबुद्धी व दिव्यता या संकल्पनांचे मांडणी करण्यात आली आहे. तर तिसऱ्या चरणात त्रिगुणात्मक सृष्टीचे वर्णन व भगवंताच्या विविध स्तुतींचा समावेश आहे. दशलक्षणांनी समृद्ध असलेले भागवत हे महापुराण म्हणजे वेदांच्या वृक्षाला माधुर्याने आलेले परिपक्व फळ होय. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा संगम म्हणजे भागवत महापुराण, असे मत ह.भ.प. प्रणव गोखले यांनी व्यक्त केले.
ग्रंथ पारायण दिंडी, पुणे यांच्या वतीने ‘श्रीमद्भागवताचे समग्र दर्शन’ या प्रवचनाचे आयोजन सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलच्या प्र. ल. गावडे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गोखले बोलत होते. ग्रंथ पारायण दिंडीचे विरेंद्र कुंटे यावेळी उपस्थित होते. प्रवचनामध्ये श्रीनारायण कवचाचे महत्त्व आणि त्याची उपासना यावरही गोखले यांनी विवेचन केले.
प्रणव गोखले म्हणाले, श्रीनारायण कवच हे प्रभावी, भक्तिपर आणि रक्षण करणारे अत्यंत शक्तिशाली स्तोत्र आहे. इंद्राला सत्तेपासून वंचित करण्यात आल्यानंतर त्याने दुर्वास ऋषींचा सल्ला घेऊन हे कवच धारण केले. हे केवळ शाब्दिक स्तोत्र नसून शरीर, मन आणि आत्मा या तीनही स्तरांवर प्रभाव टाकते आणि भक्ताला निर्भय बनवते, असेही त्यांनी सांगितले.
विरेंद्र कुंटे म्हणाले, ग्रंथ पारायण दिंडी, पुणे या संस्थेतर्फे वर्षभर अनेक आध्यात्मिक उपक्रम राबविले जातात. भागवत महापुराण सर्वश्रुत असले तरी त्यामध्ये असलेले बारकावे, महत्त्व व स्तोत्रांचे अध्यात्मिक मूल्य सामान्य जनतेला समजावे यासाठी या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. पुढील काळात भागवतातील स्कंदा प्रमाणे अनेक विषयांवर संपूर्ण भागवत निरुपण केले जाणार आहे जसे भागवतातील तत्वज्ञान, इतिहास, भौगोलिक रचना,अशा अनेक अपरिचित विषयांवर निरुपण केले जाणार आहे.

