मुंबई : स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी तसेच त्याला प्रतिबंध करण्यासाठी योग आणि आयुर्वेद औषधोपचार या उपचार पद्धतींचा समावेश करावा, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत बोलताना केली.
महाराष्ट्रात २०२३ साली स्तनाच्या कर्करोगाच्या सुमारे १९ हजार केसेस झाल्या. ७ हजार २०० मृत्यू झाले. हे प्रमाण ३७ टक्के आहे. या आजारावर होणारे उपचार त्रासदायक असतात.
ही संख्या रोखण्यासाठी आणि महिलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग, प्राणायाम, आयुर्वेद या उपचार पद्धतींचा समावेश करावा, अशी सूचना आमदार शिरोळे यांनी केली. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना आपण सामावून घेणार आहोत का? अशी विचारणा आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.
ॲलोपॅथीकडे जाताजाता आपण योग, आयुर्वेद या गोष्टी विसरलो आहोत. आरोग्य खात्यातील आयुष विभागात आपण लक्ष घातलेले आहे. उपचार पद्धतीत योग, आयुर्वेद याचा समावेश करणे गरजेचे आहे. त्याचा निश्चितच विचार करू, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

