मुंबई : वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्राला मंजूर झालेला निधी अद्याप मिळाला नसल्याबाबत विधान परिषदेत चर्चा रंगली. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित सचिवांना योग्य समज देण्यात येईल, असे जाहीर करून सभागृहाच्या सदस्यांचा सन्मान राखण्याच्या भूमिकेवर ठाम भूमिका घेतली.
विधानपरिषद सदस्य आ. हेमंत पाटील यांनी या विषयावर जोरदार आक्रमक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, “सरकारी फाईल प्रलंबित असून मी संबंधित महिला सचिवांना चार वेळा फोन केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. पंधरा-पंधरा दिवस एसएमएसला देखील प्रतिसाद मिळत नाही. हे कुठले शासकीय काम? असा दिरंगाईचा प्रकार असू नये. आमदारांना आणि या सभागृहाच्या सदस्यांना सन्मान मिळाला पाहिजे,” अशी तीव्र शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाटील यांनी पुढे असेही म्हटले की, “कॅबिनेट मंत्री दर्जा (स्टेटस) मिळाल्यावर आम्हाला शासकीय पातळीवर संवाद साधता आला पाहिजे. असा प्रतिसाद मिळत नसेल, तर मला हा दर्जा नको आहे.”
यावर प्रतिक्रिया देताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हेमंत पाटील यांना पाठिंबा देत सांगितले की, “सदस्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. सचिवांकडून अशा प्रकारे उत्तर सुद्धा न देणे ही गंभीर बाब आहे. आपण दिलेली माहिती मी गांभीर्याने घेतली असून, मी स्वतः संबंधित सचिवांना फोन करून योग्य ती समज देईन. आवश्यक असल्यास मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा करेन. या सभागृहाचे सदस्य असलेल्या कोणत्याही आमदारांचा सन्मान यामध्ये सर्वांत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या या ठाम भूमिकेचे सर्व सदस्यांनी सभागृहात बाके वाजवून स्वागत केले.

