मुंबई -काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित विधानांवरून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. याचिकेत राहुल गांधी यांना न्यायालयाने सावरकरांबद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी याचिकेची प्रत वाचण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती.ही याचिका अभिनव भारत काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडणीस यांनी दाखल केली होती. त्यांनी आपल्या याचिकेत नमूद केले होते की, राहुल गांधी यांच्या विधानांमुळे स्वातंत्र्यलढ्याच्या आदर्शांचे आणि संविधानात दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याच्या त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे.
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने “राहुल गांधी यांना कोणतीही याचिका वाचण्याचे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. एखाद्या नेत्याची विचारसरणी बदलण्यासाठी न्यायालय कोणताही बंधनकारक आदेश देऊ शकत नाही.” असे म्हणत ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्ते पंकज फडणीस यांना फटकारले.
डॉ. फडणीस हे वैयक्तिकरित्या न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी युक्तिवाद केला की, “राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षनेते आहेत आणि आपल्या लोकशाहीमध्ये अशा पदावरील व्यक्ती कधीही पंतप्रधान होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांना विशेष महत्त्व आहे.” यावर न्यायालयाने मौखिक टिप्पणी करत म्हटले, “आम्हाला माहिती नाही की ते पंतप्रधान होतील की नाही. तुम्हाला हे माहीत असेलच.”
खंडपीठाने शेवटी याचिका फेटाळताना नमूद केले की, याचिकाकर्त्याने त्यांच्या तक्रारी योग्य मंचावर मांडाव्यात. त्यामुळे राहुल गांधी यांना याचिका वाचण्याचा किंवा विचारसरणी बदलण्याचा कोणताही आदेश देऊ शकत नाही.
राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकदा विनायक सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये ‘भारत जोडो यात्रा’दरम्यान अकोल्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सावरकर यांना “ब्रिटिशांचे सेवक” आणि “पेन्शनधारक” असे संबोधले होते. त्यांनी असा दावा केला होता की सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडून पेन्शन घेण्यासाठी दया याचिका लिहिल्या.
याशिवाय, राहुल गांधी यांनी लंडनमधील एका भाषणात असा उल्लेख केला होता की, सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एका मुस्लिम तरुणाला मारहाण करून आनंद झाल्याचे एका पुस्तकात नमूद आहे. हे विधानही अनेकांच्या रोषाचे कारण ठरले होते. विशेषतः महाराष्ट्रात यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. सावरकर समर्थक आणि अनेक राजकीय नेत्यांनी राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली होती.

