सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांचे मत : श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पुणे : पुण्यातील गणेशोत्सव मंडळांचे नेहमीच कौतुक वाटते, कारण हे मंडळे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक भान राखून समाजातील प्रत्येक घटकासाठी कार्य करतात. तुळशीबाग मंडळाने गेल्या १२५ वर्षांपासून या सामाजिक कार्याची परंपरा जपली आहे. विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडणाऱ्या अशा गणपती मंडळांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील नुमवी प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम, शैलेश गुजर, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात चकोर सुबंध, साई डोंगरे, मयूर दिवेकर, प्रतीक इप्ते, तुषार पवार, सागर पेद्दी, अक्षय पुजारे, अनिरुद्ध बारणे यांनी विशेष परीश्रम घेतले. किटमध्ये १२५ दप्तरे, १२५ पाण्याच्या बाटल्या, १२५ कंपास बॉक्स आणि १२५० वह्या मुलांना देण्यात आल्या.
उदय जगताप म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करायला हवे. जे आपण पेरतो तेच उगवते, त्यामुळे भविष्यात काय हवे आहे याचा गांभीर्याने विचार करून तशीच वागणूक ठेवावी.
कोषाध्यक्ष नितीन पंडित म्हणाले, अनेक विद्यार्थी केवळ अपुऱ्या शैक्षणिक साहित्यामुळे शिक्षण सोडतात. अशा होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मंडळातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

