पुणे दि. १५ : समाज कल्याण आयुक्तालयामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकिया https://hmas.mahait.org संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार असून प्रवेशाबाबत अर्ज स्वीकारण्यासोबतच याद्या अंतिम करण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
शालेय आणि इयत्ता ११ वी व १२ वी विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी १७ जुलै रोजीपर्यंत अर्ज करावा. २१ जुलै रोजी प्रवेशाबाबतची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी २१ जुलैपर्यंत अर्ज करावा. या विद्यार्थ्यांची २५ जुलै रोजी प्रवेशाबाबत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाअंतर्गत जिल्ह्यात १४ मुलांची व १० मुलींची अशी मागासवर्गीय मुलां-मुलींची २४ शासकीय वसतिगृहे आहेत. पुणे व पिंपरी-चिचवड शहरामध्ये एकूण १२ शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलांची ८ व मुलींची ४ वसतिगृहे आहेत. तसेच १२ शासकीय वसतिगृहे ही तालुकास्तरावर आहेत. इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
0000

