मुंबई-
विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान, विधानसभेत आज (१५ जुलै) आमदार वरुण सरदेसाई, आमदार राम कदम व आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांसह केंद्रीय संस्थांच्या, संरक्षण दलाच्या अखत्यारित असलेल्या जमिनीवरील विकासकामांचा मुद्दा मांडला.त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी केवळ शासकीय कागदपत्रांवरील उत्तर दिलं. ज्यावर, विरोधी पक्षांच्या आमदारांनी आक्षेप घेतला. त्यानंतर शंभूराज देसाई संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच दोन्ही शिवसेनेच्या (ठाकरे व शिंदे) नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.
आमदार वरुण सरदेसाई म्हणाले होते की “तुम्हाला सचिवांनी जेवढी माहिती दिलीय तेवढंच उत्तर देताय. परंतु, मला ठराविक वेळ मर्यादा सांगा की ही कामं नेमकी कधीपर्यंत पूर्ण होतील.” त्यावर शंभूराज देसाईंचा पारा चढला आणि ते म्हणाले, “२०१९ ते २०२२ या कालावधीत ज्यांचं सरकार होतं त्यांनी या गोष्टीचा किती पाठपुरावा केला?”
शंभूराज देसाई म्हणाले, “घाटकोपरमधील संरक्षण दलाच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही घेतला आहे. त्यापैकी अर्धी जमीन वायूदलाची व अर्धी संरक्षण दलाची आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडू व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची विनंती करू. मात्र, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याआधी ज्या-ज्या विधानसभा सदस्यांच्या मतदारसंघांचा संरक्षण दलाच्या जमिनीशी संबंध आहे त्यांनी माझ्या दालनात यावं. आपण यासंबंधी एक बैठक घेऊन सविस्तर प्रारुप तयार करू आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करू.
यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघातील विकासामाचा मुद्दा उपस्थित केला. तर, वरुण सरदेसाई म्हणाले, “गृहनिर्माण विभागाअंतर्गत टॉप प्रायोरिटी म्हणून या गोष्टीचा पाठपुरावा करावा. कारण गेल्या आठ वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित आहे. २०१७ पासून अनेक अधिवेशनांमध्ये माझ्या मतदारसंघातील संरक्षण दालाच्या जागेवरील विकासाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप ते काम प्रलंबित आहे. अजूनही मंत्री हे काम कधीपर्यंत होईल ते सांगत नाहीत. केवळ त्यांच्या सचिवांनी दिलेलं ब्रीफिंग (माहिती) वाचून दाखवायचं काम करत आहेत.”
वरुण सरसदेसाई यांचं हे वक्तव्य ऐकून शंभूराज देसाई यांचा पारा चढला. त्यानंतर ते म्हणाले, “मला याच्या खोलात जायचं नाही. परंतु, २०१९ ते २०२२ या अडीच वर्षात कोणाचं सरकार होतं. या प्रकरणाचा पाठपुरावा तत्कालीन सरकारने एकदाही केंद्राकडे केला नाही. तुम्ही २०१९ ते २०२२ दरम्यान काय केलं? एकही पत्र पाठवलं नाही, पठपुरावा केला नाही. २०२२ ला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आम्ही केंद्र सरकारला चार पत्र पाठवली. तुम्ही काय केलं? आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा. तुमचं काम सांगा. तुम्ही काही केलंच नाही. आम्ही पत्रं पाठवली. परंतु, तुम्ही काय केलं ते सांगा.
यावेळी तालिका अध्यक्ष समीर कुणावार सातत्याने दोन्ही वाजूच्या सदस्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचं कोणीही ऐकलं नाही.यावेळी भास्कर जाधव पुन्हा उठले. त्यांनी सरकारचा कोणताही मंत्री कोणत्याही विभागावर भाष्य करत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. हे चुकीचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी गदारोळात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केले.

