अधिनियम 1976 नुसार घरे राखीव ठेवावी लागतात–म्हाडाच्या 5,285 घरे आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी
म्हाडा कोकणी मंडळाची हजारो घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांसाठी 98 घर राखीव ठेवण्यात आली आहेत. तर राज्यातील आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांची किंमत केवळ साडेनऊ लाख रुपये ठेवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.वास्तविक महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976 नुसार उत्पन्न गटांनुसार आमदार आणि खासदारांना घरे राखीव ठेवावी लागतात. या घरासाठी आमदार खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे आता या घरांच्या संदर्भात आमदार, खासदार अर्ज करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हाडाची ही घरे कल्याण सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत. ही घरे अत्यल्प – उत्पन्न गटातील नागरिकांसाठी आहेत. यातच एका आमदाराचे सध्याचे वेतन हे एका महिन्याला लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त त्यांना महागाई भत्ता आणि इतर उत्पन्न देखील असते. त्यामुळे या आमदारांना राखीव ठेवण्यात आलेली घरे आता कोणाला मिळतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हाडाची लॅाटरी निघाली आहे. पण आमदारांना 9 लाखांत घर मिळणार असे काही नाही. राज्य किंवा केंद्र कोणत्याही सरकारची योजना असो जे निकष सर्वसामान्य लोकांना लागू असतील तेच निकष आमदारांना लागू असतील, असे राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले आहे.
वास्तविक मुंबईच्या आसपास स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी कोकण गृहनिर्माण विकास मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि वसई (पालघर जिल्हा) येथे 5,285 घरे आणि ओरोस (सिंधुदुर्ग जिल्हा), कुळगाव-बदलापूर येथे 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाईल. या लॉटरीसाठी नोंदणी आणि पेमेंट प्रक्रिया आज पासून सुरू झाली. इच्छुक 13 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
कोकण मंडळाने जाहीर केलेली ही लॉटरी पाच भागात विभागली गेली आहे. 20 टक्के समावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध आहेत, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3,002 फ्लॅट, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,677 फ्लॅट, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 41 फ्लॅट (50 टक्के परवडणारे फ्लॅट). याशिवाय, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

