पंडित हेमंत पेंडसे शिष्य परिवारातर्फे मैफलीचे आयोजन…
पुणे : सुप्रसिद्ध गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित हेमंत पेंडसे यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित प्रात:कालीन रागांच्या मैफलीत अहिरभैरव, ललत, परमेश्वरी, बिलासखानी तोडी आणि सारंग यांचे सुमधुर सादरीकरण झाले.
वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात रविवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
दुबई येथील संगीतप्रेमी रसिक श्रीरंग कुलकर्णी यांच्या वतीने कै. मोरेश्वर यशवंत कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या पुरस्काराने युवा तबलावादक प्रणव मिलिंद गुरव यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण श्रीरंग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. मानपत्र, अकरा हजार रुपये रोख, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
मैफलीची सुरुवात अनुराधा लेले यांनी राग अहिरभैरवमधील ‘हे लाल अलसाने’ या बंदिशीने केली. त्यानंतर द्रुत लयीत पं. हेमंत पेंडसे रचित ‘करम तुही करतार तु’ ही बंदिश सादर करून ‘मान रे मोरा मनवा तुम’ ही रचना सादर केली. संदिप देशमुख यांनी राग ललतमधील ‘रैन का सपना’ ही पारंपरिक रचना आपल्या मधूर आवाजात सादर केली तर ‘मारी घुंगरवा खेलनवा’ ही दृत लयीत सादर केलेली रचना रसिकांना विशेष भावली. पंडित अभिषेकीबुवा यांनी गायलेली राग परमेश्वरीमधील ‘मातेश्वरी परमेश्वरी’ ही बंदिश राधिका ताम्हनकर यांनी प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून पंडित हेमंत पेंडसे यांनी रचलेला ‘दिर दिर तानुम् त देरे ना’ हा तराणा सादर केला.
विशेष निमंत्रित गायक पंडित सचिन नेवपूकर (संभाजीनगर) यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग बिलासखानी तोडीतील ‘श्री कामेश्वरी’ या पारंपरिक बंदिशीने केली. दृत लयीत ‘जा जारे जा जा रे’ ही पारंपरिक रचना बहारदारपणे सादर केली. त्यानंतर सारंग रागातील ‘तुम रब तुम साहिब’ ही पारंपरिक तसेच ‘गगरी फोडी मोरी कान्हाने’ ही स्वरचित रचना सादर केली.
कार्यक्रमाची सांगता पंडित हेमंत पेंडसे यांनी सादर केलेल्या ‘सब सखिया समझाए’ या भैरवीने झाली. कलाकारांना अभिजित बारटक्के (तबला), आदिती गराडे (संवादिनी), रोहन देशपांडे, श्रावणी कुलकर्णी, यश कोल्हापुरे, संदिप देशमुख (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली जोशी यांनी तर आभार प्रदर्शन प्राची बाब्रस यांनी केले.

