येरवडा: लोहगावमधील भारतमाता रस्त्यावर विकास आराखड्यातील (डीपी) अपूर्ण रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार असून येत्या आठवड्यात या रस्त्यासाठी मार्किंगचे (चिन्हांकन) काम पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली.
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व उघड्यावर सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भूसंपादन न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्याचे काम रखडले असून स्थानिक जागा मालकांनाही अद्याप मोबदला मिळालेला नाही. सुविधा न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या विरोधात लोहगावकरांनी मागील आठवड्यात आंदोलन करून संताप व्यक्त केला होता.
या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी रविवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांसह डीपी रस्त्याची पाहणी केली. पावसाचे पाणी व सांडपाण्यामुळे तयार झालेल्या डबक्यांची पाहणी करत त्यांनी स्थानिक जागा मालकांशी संवाद साधला. तातडीने खड्डे बुजवण्यासाठी मुरुम टाकण्यात आला.
“गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव-धानोरी परिसरातील डीपी रस्त्याचे काम रखडले आहे. पालिकेला रस्त्यासाठी आवश्यक जागेचे चिन्हांकन लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले असून जागा मालकांशी चर्चा करून रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.
या रस्त्यासाठी हद्द निश्चित झाल्यानंतर संपूर्ण काम नियोजनबद्धपणे मार्गी लावले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली.

