मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तर सत्रात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी पुणे महानगरपालिकेतील अपुऱ्या कर्मचारी संख्येचा व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा उपस्थित केला.
बापूसाहेब पठारे यांनी सभागृहात बोलताना सांगितले, की “सद्यस्थितीला पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ चौरस किमी आहे, तर मुंबई महानगरपालिकेचे क्षेत्रफळ ४३७ चौरस किमी आहे. क्षेत्रफळ मोठे असूनही पुणे महापालिकेत फक्त ८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत, तर मुंबई महापालिकेत तब्बल २८ हजार कर्मचारी आहेत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “ठेकेदारांकडून पुरवल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २५ टक्के कर्मचारी रोज गैरहजर असतात. त्यामुळे पुणे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर थेट परिणाम होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे.”
“या एकूण परिस्थितीला जबाबदार कोण?” असा थेट सवालही पठारे यांनी सभागृहात उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ यांनी पुणे महानगरपालिका व तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले आहे.
बापूसाहेब पठारे यांनी यासंदर्भात पुणे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, वाढत्या नागरी गरजांसाठी पुरेशी मनुष्यबळ व्यवस्था करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

