मुंबई : झाडांच्या फांद्या तुटून होणारे अपघात टाळण्यासाठी खाजगी जागेतील फांद्या सवलतीच्या दरात पुणे महापालिकेकडून छाटणी करून मिळावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (सोमवारी) विधानसभेत केली.
पुणे शहरामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे कर्वेनगर मध्ये खासगी जागेतील झाड़ पडून दोघांचा मृत्यू झाला. तसेच फांद्या पडून रस्ते बंद होणे , वाहतूक कोंडी होते, फांद्या पडून वाहनांचे नुकसान होणे, असेही प्रकार घडत आहेत, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी सभागृहाला दिली.
महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली जाते, पण खासगी जागेतील झाडांच्या फांद्यांची छाटणी जागेच्या मालकाला पालिकेची परवानगी घेऊन स्वतः करून घ्यावी लागते. मात्र यात बऱ्याच अडचणी येतात. पालिकेकडून परवानगी मिळण्यात विलंब होतो, ठेकेदाराकडून छाटणीसाठी खूप जास्त पैसे वसूल केले जातात. याकरीता सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन फांद्या छाटणीच्या परवानग्या लवकरात लवकर नागरिकांना दिल्या जातील, हे पहावे. तसेच फांद्याची छाटणी सवलतीच्या दरात करून मिळावी. महापालिकेकडून याबाबत नियोजन केले जावे, सरकारने तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

