नवी तारीख एक-दोन दिवसांत कळवणार
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेनेच्या वादावर सुनावणी झाली. त्यात सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढील 3 महिन्यांत निकाली काढण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यामुळे शिवसेना हे नाव व धनुष्यबण हे निवडणूक चिन्ह कुणाचे? यावर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात फैसला येण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात जून 2022 पासून शिवसेनेचा वाद प्रलंबित आहे. यावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेत 2022 मध्ये मोठी बंडखोरी झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशांना उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. त्यांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात खंडपीठाने हे प्रकरण ऑगस्टमध्ये सुनावणीसाठी घेण्याचे संकेत दिले. तत्पूर्वी ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे या प्रकरणी आजच सुनावणी घ्या असा आग्रह धरला. पण कोर्टाने आज प्रकरण ऐकण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणी पुढील महिन्यात एखादी जवळची तारीख दिली जाईल, असे कोर्ट म्हणाले.
वकील सिद्धार्थ शिंदे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत एक मोठे विधान केले आहे. कोर्ट म्हणाले की, हे अर्ज वगैरे दाखल करणे आता बंद करा. प्रस्तुत प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचा निकाल किंवा मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ. त्यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारीख मागितली. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपण आपले रोस्टर पाहून ऑगस्टमधील एखादी तारीख देतो, ती तुम्हाला एक-दोन दिवसांत कळवण्यात येईल असे सांगितले.
त्यानुसार ऑगस्टमध्ये या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यानंतर निकाल राखून ठेवला जाईल. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष व चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो. आता ऑगस्टमध्ये ही केस पुन्हा बोर्डावर येईल. त्यावर सुनावणी होईल. पण आज सुप्रीम कोर्टाने एक ठळक सांगितले आहे की, आता 2 वर्षे झाली आहेत आणि आता आम्हाला या मॅटरचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. आता पुढील महिन्यात होणाऱ्या सुनावणीत पक्ष व चिन्ह एकनाथ शिंदेंबरोबरच राहील की ते परत उद्धव ठाकरे यांना दिले जाईल.
वकील सिद्धार्थ शिंदे पुढे बोलताना म्हणाले, आज सुप्रीम कोर्टाने केलेले विधान हे उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असेच म्हणावे लागेल. कारण, मागील 2 वर्षांपासून जी अनिश्चितता होती ती आता सुप्रीम कोर्टानेच दूर केली आहे. कोर्टाने स्वतःच या प्रकरणी ऑगस्ट महिन्यातील तारीख देण्याची घोषणा केली आहे. त्यात एक-दोन दिवस सुनावणी चालेल, सुनावणी तहकूब होईल. पण चालू वर्षाच्या आत हे प्रकरण निकाली निघेल हे नक्की.
या मधल्या काळात निवडणुका लागल्या तर सध्या आहे तीच परिस्थिती राहील. पण ऑगस्ट किंवा त्यापुढील दोन महिन्यांत निकाल आला तर स्थिती स्पष्ट होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न हे प्रकरण ऑगस्ट महिन्यातच निकाली निघेल असा राहील, असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे गटाच्या वकिलांनी यावेळी ठाकरे यांच्या याचिकेला कडाडून विरोध केला. याचिकाकर्त्यांनी ही याचिका आत्ताच का दाखल केली? ते मागील 2 वर्षांपासून झोपा काढत होते का? असा प्रश्न उपस्थित केला. पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. आतापर्यंत जे झाले ते झाले. आता 2 वर्ष संपलेत. आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावाच लागेल, असे कोर्ट म्हणाले. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल पुढील 3 महिन्यांत अपेक्षित आहे, असे सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपल्या याचिकेद्वारे शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह तथा वाघासह भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार गटाला सशर्त चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. तशी परवानगी आम्हाला दिली जावी असा त्यांचा युक्तिवाद आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच ठाकरेंची अशी मागणी फेटाळल्याचा दावा केला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक यापूर्वीच एका नावाने व चिन्हाने झाल्या आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ठाकरेंची अशीच एक याचिका यापूर्वी धुडकावून लावली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी केली होती. त्यांच्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार गेले होते. त्यानंतर शिंदेंनी भाजपच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. या घटनाक्रमानंतर त्यांनी थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यानंतर निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारावर त्यांना शिवसेना नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह प्रदान केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही 10 जानेवारी 2024 रोजी शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा दिला. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपील सिब्बल यांनी याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना 22 जानेवारी 2024 रोजी शिंदे गटासह सर्वच बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती.

