दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता असला तरी त्याचेवर कडक कारवाई झाली पाहिजे
मुंबई- शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकून त्यांच्या तोंडाला काळे फासले होते. मात्र, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा भाजपचा सक्रिय पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. याबाबत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.यासंबंधी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पक्षाशी काही संबंध नाही. अशा खालच्या पातळीवरचे कृत्य करणे हे भाजपच्या रक्तात नाही. प्रवीण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी करायला हवी. याच्याशी आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे. पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो कोणत्याही पक्षाचा असेल तरी तो आरोपी असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट मध्ये काळे फासण्यात आले होते. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते राज्यभर दौरे करत असतात. अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आले होते. या कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत होत असतानाच ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रवीण गायकवाड यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत असल्याचा आरोप केला होता. या घटनेमध्ये प्रवीण गायकवाड यांना मारहाण देखील करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड आपल्या गाडीमध्ये बसले होते. मात्र त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढून देखील मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जाणून बुजून एकेरी उल्लेख करणाऱ्या संभाजी ब्रिगेड संघटना व संभाजी ब्रिगेड पक्ष यांचा जाहीर निषेध करत शिवधर्म फाउंडेशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर या आधी देखील मोर्चा काढला होता. संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज असे पूर्ण लिहावे किंवा संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी पुणे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

