महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि केअर फाउंडेशन यांच्या सह अनेक संस्थांचा सहभाग.
पुणे : कोथरूड येथील संजीवन वनउद्यानात नुकताच भव्य वृक्षलागवड उपक्रम पार पडला. महा एनजीओ फेडरेशन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज, व्ही. के. ग्रुप आणि केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे तब्बल २०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी मिळून ५०० देशी वृक्षांचे रोपण केले.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन अमोल उंबरजे, मेघना पिंगळे आणि मयूर वारेगावकर यांनी केले. यानंतर झाडांची निगा केअर संस्था तर्फे घेतली जाणार आहे. संस्थापक शेखर मुंदडा व ट्रस्टी अपूर्वा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने महा एनजीओ फेडरेशन व सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज दरवर्षी अनेक संस्था यांना एकत्रित आणून अशा प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम राबवित असतात.
उपस्थित मान्यवरांमध्ये अमोल उंबरजे, मुकुंद शिंदे, वीरेंद्र बोराडे, मयुर वारेगांवकर, सविता कोठाले, मेघना पिंगळे, रक्षा कपले, कांचन सिधये, वैभव मोगरेकर, अपूर्वा कारवा, कोमल गांधी व इतर मान्यवर यांचा समावेश होता.
या वृक्षलागवडीत स्थानिक प्रजातींचा व देशी झाडांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या उपक्रमात मतिमंद, अनाथ, वयोवृद्ध, युवक, आदिवासी व्यक्तींचाही सहभाग असून एक सामाजिक समावेश आणि पर्यावरणपूरक बांधिलकी याचे उत्तम उदाहरण साकारले गेले.
या उपक्रमात सहभाग नोंदवलेल्या प्रमुख संस्थांमध्ये व्ही. के. ग्रुप, आयजीबीसी पुणे चॅप्टर, ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर, नवक्षितिज, एफएसएआय, ममता फाउंडेशन, इशरे पुणे चॅप्टर, रवींद्र जाधव ग्लोबल फाउंडेशन, रोस्ट्रम इंडिया सोशल ऑर्गनायझेशन, जिनस्पोर्ट, रिझिलियंट, जिनओंबिओ, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांचा समावेश होता. या सर्व संस्थांनी आपली सामाजिक जबाबदारी जपत पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील सहभाग नोंदवला.
अमोल उंबरजे यांनी सांगितले की, “वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, पण त्यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे ही अधिक जबाबदारी आहे. सर्व संस्थांनी एकत्र येत वृक्षलागवड करून, त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे, हे आपले कर्तव्य आहे.”
मयूर वारेगावकर यांनी “वृक्षलागवड कसे केले पाहिजे आणि त्यानंतर काय काळजी घ्यावी लागते” यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा शेवट सहभागी प्रतिनिधींना प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आला. सहभागी सदस्यांनी स्वतः खड्डे खणून झाडे लावल्याचा विशेष आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

