मुंबई-ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. यावर कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करते, पण एक प्रश्न इथे येतो की, माधव भंडारी जे आमच्या विरोधात इतके बोलत होते, त्यांना संधी दिली गेली नाही.भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 250 आहे, ज्यामध्ये 238 निवडून आलेले आणि 12 नामांकित सदस्य आहेत.
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, पूनम महाजन यांच्या वडिलांपासून भाजपमध्ये सगळे सक्रिय आहेत, त्यांना डावलण्यात आले आणि जे मागून आले त्यांना संधी दिली, अशा शब्दांत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच लोकसभेत त्यांना मी नाही, जनतेने पाडले आहे. जनतेने त्यांचा पराभव केला आहे, असेही वर्ष गायकवाड म्हणाल्या.लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी दिली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ही त्यांची पहिलीच राजकीय निवडणूक होती. पराभवानंतर देखील उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कॉंग्रेसने त्यांच्या नियुक्तिवर फेरविचार करण्यात यावा असे सुचवत त्यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.
वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या, आजही संविधान बचाव जनसंवाद सभेचे आयोजन केले जात आहे. सध्या देशात असंविधान सुरू आहे. सगळीकडे कचऱ्याचे साम्राज्य आहे. अशा नागरिकांचा आवाज बनणार तरी कोण? त्यासाठी आम्ही ही सभा आयोजित केली आहे. लोकांना संविधानाने बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. पत्रकारांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार सरकारकडून काढला जात आहे. आम्ही अदानीबद्दल बोलतो, त्यांच्यावर आम्ही बोलायचे नाही का मग? सगळे माओवादी कसे होऊ शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, उज्ज्वल निकम यांच्या व्यतिरिक्त केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे. या नियुक्त्या त्या जागांसाठी करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्ती मुळे रिक्त होत्या.

