नवी दिल्ली: यंदाच्या वर्षी भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीचे(८ सप्टेंबर १९२६ _२०२६) वर्षसुरू होणार असुन देशाच्या सीमावर्ती भागातील जनतेशी नाते जोडण्यासाठी स्थापन झालेल्या सरहद संस्थेच्या वतीने भारतरत्न स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर पुणे, मुंबई तसेच दिल्लीत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
भूपेन हजारिका त्यांच्या अंतिम काळात मुंबईत सरहद संस्थेचा त्यांच्याशी संपर्क आला होता . ईशान्य भारतातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेण्याचेही ठरले होते.महाराष्ट्राशी त्यांचे आपुलकीचे नाते होते.त्यांच्या आयुष्याचा दीर्घकाळ मुंबईतच गेला ते महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानत असत. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने संस्थेने त्यांच्या कुटुंबियांच्या संमतीने भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार सुरू केला. यंदाच्या वर्षीही ईशान्य भारतातील विविध मान्यवरांना त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येणार आहे.
शिवाय पुस्तक प्रकाशने, परिसंवाद, व्याख्याने. हजारिका यांच्या अप्रकाशित गीतांना संगीत देणे, त्यांच्या नावाने स्टुडिओ आणि स्व.जमनाबाई फिरोदिया ईशान्य भारत भवनाची पुण्यात उभारणी असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संगीताच्या माध्यमातून हिंसाचार आणि दहशतवादाचे प्रमाण कमी करणे शक्य आहे असे त्यांचे ठाम मत होते. हीच स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दी निमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची मध्यवर्ती कल्पना आहे.
ईशान्य भारत विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात येणार असुन या उपक्रमांचा शुभारंभ सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात करण्यात येईल असेही पत्रकात पुढे म्हटले आहे.
सरहद संस्था भारतरत्न स्व.भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर विविध उपक्रम राबविणार.
Date:

