पुणे, १३ जुलै – सायबर मैत्र आणि GRY फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “नथिंग डुईंग” या अनोख्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. द लाईव्ह, बिडकर आयकॉन, मदन तलाठी पथ, राहुल नगर येथे सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
४५ मिनिटे कोणतीही हालचाल न करता, न बोलता, न वाचता, न फोन वापरता – फक्त शांत बसणे ही कल्पना अनेकांसाठी नवी होती, पण विलक्षण अनुभव देणारी ठरली. किशोरवयीन मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक या ‘चॅलेंज’ मध्ये सहभागी झाले.
कार्यक्रमाचे निरीक्षक म्हणून निरंजन मेढेकर, ममता क्षेमकल्याणी आणि अभिजित पेंढारकर यांनी निरीक्षक म्हणून काम बघितले.
प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिरीषा साठे या प्रमुख पाहुण्यांनी ‘डोपामिन सर्ज’ आणि डिजिटल माध्यमांच्या व्यसनाधीनतेबाबत अभ्यासपूर्ण व अंतर्मुख करणारे विचार मांडले. सततच्या ऑनलाईन वापरामुळे कंटाळवाण्या क्षणांना सामोरे जाण्याची आपली क्षमता कमी होत चालली आहे, हे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
सायबर मैत्रच्या संस्थापक मुक्ता चैतन्य यांनी कार्यक्रमामागील हेतू सांगताना सांगितले:
‘नथिंग डुईंग’ हा फक्त एक प्रयोग नसून एक चळवळ आहे. सततच्या डिजिटल वापरामुळे, करमणुकीच्या शोधात, आणि डोपामिनच्या अतिरेकात आपण स्वतःपासून दुरावत चाललो आहोत. या उपक्रमामार्फत लोकांना पुन्हा एकदा स्वतःकडे वळण्याची, शांतपणे काहीही न करता बसून राहण्याची संधी मिळावी, असा माझा हेतू होता. हे केवळ अनप्लगिंग नाही, तर स्वतःशी पुन्हा एकदा जोडून घेण्याचा प्रयत्न आहे.
सायबर मैत्र आणि GRY फाउंडेशन यांनी या आगळ्या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानले. यापुढेही असे कार्यक्रम सातत्याने राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमानंतर अनेक सहभागींनी या ४५ मिनिटांच्या शांततेचा अनुभव अतिशय सकारात्मक आणि अंतर्मुख करणारा असल्याचे सांगितले.

