पुणे: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने आज, १३ जुलै रोजी कोथरूडमधील गांधी भवन येथे झालेल्या ‘गांधी दर्शन’ शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. या २२ व्या शिबिरात विविध वयोगटांतील कार्यकर्त,नागरिक सहभागी झाले.
शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यांनी आपल्या भाषणात गांधी विचारांचे सामाजिक व राजकीय महत्त्व आजही कायम असल्याचे सांगून, युवकांनी गांधी तत्त्वज्ञानाशी नवा संवाद साधावा, असे आवाहन केले.सगळे एकसारखे असावे, असे वाटणारा राष्ट्रवाद हा भरकटतो. राष्ट्रवाद हा प्रगल्भ नसेल तर भरकटतो. गांधीवाद हा भरकटलेल्या राष्ट्रवादाला उत्तर आहे’. असेही ते म्हणाले.
लेखक आणि तंत्रज्ञानतज्ज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांनी “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाजावरील परिणाम” या विषयावर अत्यंत समर्पक आणि विचारप्रवर्तक मांडणी केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या वेगाने बदलणाऱ्या जगात गांधीजींच्या मूल्यांची गरज अधिक तीव्र असल्याचे अधोरेखित केले.
ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी “जागतिकीकरण आणि स्थानिक समाजरचना” यावर भाष्य करताना जागतिकीकरणाच्या विळख्यात हरवणाऱ्या मूल्यांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, गांधीजींचे विचार जागतिकीकरणालाही मानवतेचा चेहरा देऊ शकतात.महाराष्ट्राने प्रबोधनाचे कार्यक्रम थांबवता कामा नये. केडर कॅम्प, शिबीरे सुरु राहिली पाहिजेत.बाजारपेठ जिंकणे हा जागतिकीकरणाचा उद्देश असतो.सार्वजनिक व्यवस्था बदनाम करून भांडवलशाहीकडे दिल्या गेल्या.इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, आणि इतिहास वर्तमानाचे प्रश्न सोडवत नाही. तरीही इतिहासासाठी आपण भांडत बसतो’, अशीही टिप्पणी त्यांनी केली.
लेखक आणि कायदेतज्ज्ञ ऍड. शंकर निकम यांनी “भरकटलेला राष्ट्रवाद” या विषयावर आपले विचार मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, खऱ्या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे सन्मान, समता आणि सर्वसमावेशकता – जे गांधीजींच्या विचारसरणीत प्रकर्षाने दिसते.
राष्ट्रवाद सर्वसमावेशक असला पाहिजे. हिटलर चा राष्ट्रवाद हा फसलेला राष्ट्रवाद होता. संकुचितपणा हा राष्ट्रवादाला घातक आहे.चकवा लागलेल्या नेतृत्वाच्या मागे गेल्यावर समाजाची हानी होते’.
अनिकेत पालकर यांनी वक्त्यांचे स्वागत केले.अन्वर राजन, एम एस जाधव, ज्ञानेश्वर मोळक, अप्पा अनारसे, स्वप्नील तोंडे इत्यादी उपस्थित होते.
शिबिरात सत्य, अहिंसा, सामाजिक बांधिलकी, ग्रामस्वराज्य आणि स्वावलंबन यासारख्या मूलगामी विचारांवर चर्चा झाली. सहभागींसाठी हे शिबिर वैचारिक समृद्धीचा आणि अंतर्मुखतेचा अनुभव ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात सहभागींनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन हे केवळ स्मरणरंजन नव्हे, तर गांधीवादी तत्त्वांना नव्या पिढीसमोर अर्थपूर्ण रीतीने सादर करण्याचा प्रयत्न होता. या शिबिरातून मिळालेल्या प्रेरणेने युवक आणि कार्यकर्त्यांनी गांधी विचारांची व्याप्ती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
………

