पुणे -राष्ट्रपतींनी राज्यसभेसाठी चार नवीन नामांकित सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये ज्येष्ठ वकील आणि लोकसभा निवडणुकीत भाजपचे मुंबईतील उमेदवार उज्ज्वल निकम यांचा समावेश आहे. निकम हे अजमल कसाबसह अनेक हाय-प्रोफाइल फौजदारी खटल्यांमध्ये सरकारी वकील होते.
त्यांच्याशिवाय, केरळचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि सुप्रसिद्ध इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेवर नामांकित करण्यात आले आहे. या नियुक्त्या त्या जागांसाठी करण्यात आल्या आहेत, ज्या पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्ती मुळे रिक्त होत्या.
भारतीय संविधानाच्या कलम 80 (3) अंतर्गत, राष्ट्रपतींना राज्यसभेत 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. हे सदस्य कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा यासारख्या क्षेत्रात विशेष योगदानासाठी निवडले जातात. राज्यसभेच्या एकूण सदस्यांची संख्या 250 आहे, ज्यामध्ये 238 निवडून आलेले आणि 12 नामांकित सदस्य आहेत.
प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर अशी ओळख असलेले उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. 26/11च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. यासोबतच 1993 बॉम्बस्फोट प्रकरण, गुलशन कुमार हत्या आणि खैरलांजी सारख्या गाजलेल्या प्रकरणात सरकारची बाजूही त्यांनी मांडली. गुन्हेगाराला कोर्ट शिक्षा देतेच पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा व्हायला नको, हे तत्त्व उज्ज्वल निकम यांनी आचरणात आणले आहे. त्यामुळे ते गुन्हेगारांना शिक्षा मिळावी यासाठी करावे लागणारे परिश्रम, मिळणार्या धमक्या, अशातही ते मोठ्या धैर्याने उभे राहातात.

