पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी दोन अतिरिक्त तुकड्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंजुरी दिल्याची माहिती प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांनी कळविली आहे.
त्यामुळे इयत्ता अकरावी कला आणि विज्ञान शाखांच्या इंग्रजी माध्यमासाठी स्वयंअर्थसहाय्यीत तत्वावर प्रत्येकी एक नवीन तुकडी मिळाली आहे. आता फर्ग्युसनमध्ये विज्ञान विभागाच्या आठ आणि कला विभागाच्या चार तुकड्या झाल्या आहेत. नवीन तुकड्यांमध्ये प्रत्येकी 120 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने केले जात आहेत. आज (रविवारी) दुसऱ्या फेरीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची अंतिम मुदत आहे. विद्यार्थी आणि पालकांना त्याप्रमाणे महाविद्यालयाचे प्राधान्यक्रम ठरवता येतील.

