पुणे-सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. बेशिस्त वागणारा माणूस कितीही मोठ्या बापाचा असला तरी मी पोलिसांना त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत. मग तो अजित पवार असो किवा अजित पवारांचा कुणी नातलग असो, असे ते म्हणालेत.
अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना उपरोक्त शब्दांत इशारा दिला. ते म्हणाले, कधी कधी दुचाकीवाले इकडे-तिकडे पाहतात आणि हळूच राँग साईडने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो मुलगा किंवा व्यक्ती कितीही मोठ्या बापाचा असला तरी, मी त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार आहे. त्याला त्याच्या 10 पिढ्या आठवल्या पाहिजेत. कुणीही अजिबात नियम तोडू नका. मग तो अजित पवार असो की अजित पवाराचा नातलग असो. सर्वाना नियम सारखा आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, मी जे करतो ते बारामतीकरांसह सर्वांसाठी करतो. मी अनेक ठिकाणी झाडे लावली. पण तिथे कुणीपण येत आहे. जनावरे चरत आहेत. पण तसे चालणार नाही. जिथे माणसांना बसण्यासाठी जागा केली आहे, तिथे एक दुचाकीस्वार निवांत मांडी घालून लोकांसोबत गप्पा मारत होता. मी गाडी वळवली व पोलिसांना सांगितले की, याची गाडी ताब्यात घे आणि याला चांगला टायरमध्ये घाल. मग त्याने चुकले म्हणून विनवणी केली.
मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करणार–अजित पवारांनी यावेळी शहरातील मोकाट जनावरांच्या मुद्यावरही भाष्य केले. काही जण चुका करतात. रस्त्यावर कचरा टाकतात. जनावरे चरायला सोडतात. मी त्यांना सांगतो, ती जनावरे कोंडवाड्यात घाला. ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना बाजार दाखवतो. मालकांनाही माझा इशारा आहे. त्यांच्यावरही केसेस होतील. ज्यांची गाढवं आहेत, जनावरे आहेत, ज्यांच्या गायी इकडे-तिकडे फिरत असतात, त्यांनी ते आपल्या दारात बांधाव्यात. त्यांना काय खायला-प्यायला घालायचे ते घालावे. मी बारामती जी चांगली करतो, ती काय सर्वांना कसेही फिरण्यासाठी नाही, असे ते म्हणाले.

