मुंबई, दि. १० जुलै २०२५ : सोयाबीन सहकारी खरेदी केंद्रातील खरेदी प्रक्रियेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांचा चार्ज तातडीने काढण्याचे निर्देश दिले. “पुढील दोन तासांत कारवाई झालीच पाहिजे. अन्यथा कागदपत्रे नष्ट होण्याचा धोका संभवतो,” असा स्पष्ट इशारा त्यांनी सभागृहात दिला.
विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे यांनी भोकरदन तालुका, जिल्हा जालना येथे झालेल्या बोगस सोयाबीन खरेदी प्रकरणाचा तपशील मांडत ३०७ सारख्या गुन्ह्यांत अडकलेल्या दौंड कुटुंबीयांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. खरेदी केंद्रांमार्फत पीक नोंद नसलेल्या शेतकऱ्यांकडून खरेदी करून, बनावट संस्थांच्या माध्यमातून पैसे लाटल्याचा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणावर उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, २५१९ शेतकऱ्यांकडून ३९ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यामध्ये १९ शेतकऱ्यांच्या सातबारावर सोयाबीन नव्हते, तरीही त्यांच्याकडून खरेदी दाखवून रकमा वर्ग करण्यात आल्या. यामध्ये सध्या भागवत दौंड व इतर नऊ जणांवर गुन्हे दाखल असून, पोलीस तपास सुरू आहे. डीएमओ विजय राठोड यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावर कठोर पवित्रा घेत जिल्हा पातळीवरील दोषी अधिकाऱ्यांचा कार्यभार आजच मागे घेण्याची मागणी केली. “अशा भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतो. त्यामुळे चौकशी प्रक्रियेत गती आणून दोषींना शिक्षा व्हावी,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

