अधिकारी मजा मारत राहिले …अन सरकार बघत बसले …
मुंबई-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेली मौजे तळवली, तालुका-कल्याण येथील जमीन भूमाफियांनी बळकावली व तिथे ‘तनिष्का रेसिडेन्सी’ नावाने ७ मजली इमारत उभी केली. आज याच मुद्द्यावरुन विधानसभेत आक्रमक होत अशा भूमाफियांना तडीपार करण्याची व त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
शेख म्हणाले, भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदारांच्या जमीनीत हे भूमाफिया जर घुसखोरी करित असतील तर सर्वसामान्यांच्या मालमत्ता कशा सुरक्षित राहतील..?
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम २६० व २६७ (१) अन्वये १७/०२/२०२३ रोजी या इमारतीच्या बाबतीत सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी विकासकाने इमारतीच्या अधिकृततेबाबत कोणतीही कागदपत्र सादर केली नसल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ४७८ मधील तरतुदीं नुसार दि. १४/०२/२०२३ च्या आदेशान्वये इमारत महानगरपालिकेकडून अनधिकृत घोषित करण्यात आली.
इमारत २०२३ साली अनधिकृत घोषित करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात मात्र ही इमारत निष्कासीत करण्यासाठी २०२५ साल उजाडावे लागले. मुळात एवढी मोठी इमारत उभी राहत असताना पालिकेचे अधिकारी काय करत होते..? आणि इमारत २०२३ साली अनधिकृत घोषित झाल्यानंतर ती पाडण्यासाठी २०२५ साल का उजाडावे लागले..?
इमारत बांधत असताना डोळेझाक करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार..?
इमारत निष्कासीत केली गेली, मात्र ही इमारत बांधणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अद्याप का करण्यात आली नाही..? अशा विकासकांना तुम्ही तडीपार करणार आहात का..? एमपीडीए अंतर्गत अशा भूमाफियांवर कारवाई केली जाईल का..?
ज्या नागरिकांनी इमारत अधिकृत आहे असे समजून घरांसाठी आगाऊ रक्कम विकासकाला दिली होती, त्यांचे पैसे कोण परत करणार…? असे अनेक प्रश्न उपस्थित करत शेख यांनी सरकारला धारेवर धरले.
शेख पुढे म्हणाले दररोज मुंबईत शासनाच्या जागेवर शेकडो अनधिकृत झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना तडीपार करण्यात याव व त्यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेख यांनी केली.
आमदार अस्लम शेख यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना मंत्री बावनकुळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुद्दा उपस्थित करुन हा सर्व प्रकार उघडकीस आणल्याबद्दल शेख यांचे अभिनंदन केले. मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्यांनी या अनधिकृत इमारतीमध्ये घरे विकत घेतली, त्यांचे पैसे परत भेटलेच पाहिजेत. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून एक विशेष बाब म्हणून हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यात येणार आहे. महसूल विभागाने आपल्या अधिकार क्षेत्रात कारवाई केलेलीच आहे. त्याच बरोबर गृह विभाग व नगरविकास विभाग यांच्या सोबत विचार विनिमय करुन भूमाफियांवर कठोर कारवाईचे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले.

