कर्नाटकात म्हैसूरमध्ये श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डियोव्हॅस्कुलर सायन्सेस अँड रिसर्चचे मोठे रुग्णालय आहे. सायंकाळचे ४.०० वाजले तरीही ३०० लोक येथे आहेत. यात बहुतांश १११ किमी दूर हासन व मांड्यातून आले आहेत. तेथे ४० दिवसांत हृदयविकाराच्या झटक्याने सुमारे ३० मृत्यू झाले आहेत. मृतांचे वय १९ ते ४५ दरम्यान होते. त्यामुळे या वयोगटातील बहुतांश लोक या रुग्णालयात तपासणीसाठी आले आहेत.
यातील ४२ वर्षीय डी.सदागौडा यांनी सांगितले की, आमच्या भागात भीतीचे वातारण आहे. सर्व लोक घाबरले आहेत. आम्ही ३० जण सोबत आलो आहोत. दोन दिवसांपासून रांगेत आहोत, मात्र नंबर आला नाही. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के.एस. सदानंद यांनी भास्करला सांगितले की, येथे हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या १००% हून जास्त वाढली आहे. याआधी रोज ३०० ची ओपीडी होती. आता हासन, मांड्या, कोडागू, चामराजनगरमधून १ हजार लोक येत आहेत. सकाळी ५.०० पासून रांग लागली आहे. हासनची माती आणि पाण्यात असे काही नाही, ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकेल, हे आम्ही लोकांना समजून सांगितले आहे. हे केवळ जीवनशैलीचे प्रकरण आहे.
डाॅ. सदानंद यांच्यानुसार, कन्नड अभिनेता पुनीतकुमार यांच्या हार्ट अटॅकने झालेल्या मृत्यूनंतर जशी गर्दी झाली होती, तशी आता होत आहे. लोक छातीत जळजळ झाल्यावरही रुग्णालयात येत आहेत. याचे कारण म्हणजे, हृदयविकाराची समस्या तिशीतील लोकांनाही होत आहे. हासनच्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.अनिल म्हणाले, सामान्य वैद्यकीय अहवाल आल्यानंतरही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही.त्यामुळे अनेक जण बंगळुरू आणि म्हैसूरला येत आहेत.
श्री जयदेव इन्स्टिट्यूटचे संचालक डाॅ. रवींद्रनाथ म्हणाले, हासनच्या खासगी रुग्णालयांत हृदयविकाराचे २०० वर रुग्ण आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचा मृत्युदर ५ ते ६% असतो. अनेकदा हा ८% पर्यंत पोहोचतो. गेल्या ४० दिवसांत तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे रुग्ण का वाढले, याची चौकशी केली. मात्र, हासनमध्ये होत असलेले मृत्यू राज्यातील इतर जिल्ह्यांसमान आहेत.

