मुंबई- भाजप खासदार निशिकांत दुबे ने मराठी आणि महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधान करत मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राला आम्ही पोसतो, असे विधान दुबे ने केले होते. तसेच आपल्या घरात कुत्राही वाघासारखा वागतो, बाहेर पडून बघा पटक पटक कर मारेंगे म्हणत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला होता. परंतु, निशिकांत दुबे याचा मुंबईत फ्लॅट असून तो भाडे तत्त्वावर दिला असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी दिली आहे.
निशिकांत दुबे बद्दल माहिती देताना सचिन अहीर म्हणाले, निशिकांत दुबे मुंबईत 16 वर्षे राहिला आहे. ठाकरे बंधू आणि मराठी माणसावर टीका करताना मुंबईत आपला फ्लॅट आहे याचा विसर त्याला पडला असल्याचे अहीर म्हणाले. तसेच मुंबई येथील खार झुलेलाल अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. निशिकांत दुबे, 404, झुलेलाल अपार्टमेंट, मार्ग क्रमांक 16, खार पश्चिम, असा त्यांचा पत्ता होता, अशी माहिती सचिन अहीर यांनी दिली आहे.
निशिकांत दुबे यांनी 2009 साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी या फ्लॅटचा उल्लेख आपल्या मालमत्ता यादीत केला होता. 1993 ते 2000 या कालावधीत निशिकांत दुबे मुंबईत नोकरी करत होता . इथे नोकरी करत संचालक पदापर्यंत त्याने प्रगती केली. मात्र, मुंबईत राहिलेल्या या नेत्याला मुंबईच्या वास्तव्याचा विसर पडलेला दिसत आहे.सचिन अहीर म्हणाले, निशिकांत दुबे यांनी खारमधील मालमत्ता ही 1 कोटी 60 लाख रुपयांना विकत घेतली होती. या आलिशान फ्लॅटची आत्ताची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. या घराचे भाडेही त्यांना मिळत आहे. सचिन अहीर यांनी विधान परिषदेत बोलताना निशिकांत दुबे याची संपूर्ण माहिती सांगत त्यांच्यावर टीका केली.

