मुंबई–नवापूर तालुक्यात १९९ बेकायदा चर्च आहेत. यातून स्थानिक आदिवासींचे धर्मांतर होत असल्याचा प्रश्न लक्षवेधी सूचनेतून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केला. आमदार अतुल भातखळकर, संजय कुटे, गोपीचंद पडळकर यांनीही राज्यात अद्याप धर्मांतरबंदी कायदा लागू नसल्याचे सांगितले. त्यांनी विचारले की, हा कायदा कधीपर्यंत लागू होईल? अनुसूचित जाती-जमातीतील नागरिकांचे धर्मांतर करूनही त्या प्रवर्गाच्या योजना आणि सुविधा लाटल्या जात असल्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असे अनधिकृत चर्च तातडीने पाडण्यात येतील, असे आश्वासन दिले. ज्या चर्चच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांची विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
धर्मांतर झाल्यानंतरही त्या-त्या समाजाच्या सवलती घेतल्या जातात. ते धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्मांतर झालेल्या आदिवासी बांधवांना परत आणण्यासाठी आदिवासी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली, राज्यातील सर्व आदिवासी आमदारांची एक समिती गठित करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.आदिवासींमधून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या आदिवासींना कोणताही कागदोपत्री पुरावा दिला जात नाही. १२ राज्यांत धर्मांतर बंदीचा कायदा लागू आहे. महाराष्ट्रात हा कायदा कधी लागू होईल? राज्यातील अतिक्रमण केलेले चर्च कधी पाडण्यात येईल? ज्यांनी हिंदू प्रलोभनात येऊन धर्मपरिवर्तन केले आहे त्यांना परत कसे आणता येईल आणि त्यासाठी सरकार काय करणार? असेही अग्रवाल म्हणाले.गृह विभागाकडे याचा अहवाल आहे. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून धर्मांतर होणार नाही यासाठी अजून कडक कायदा कसा करायचा यासाठी चर्चा करणार आहे. धर्मांतर होऊ नये, त्याचा प्रयत्नही करू नये. पुढील ६ महिन्यांत विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून चर्चेविरुद्ध आलेल्या तक्रारी तपासून चर्च काढण्यात येतील.
या चर्चच्या बांधकामासाठी विदेशातून पैसा येतो. गेल्या वर्षी १५१५ संस्थांना विदेशातून पैसा आला. धर्मांतरावर कारवाईची जबाबदारी गृह विभागाला दिली आहे. मात्र, पोलिसांवर कामाचा ताण असतो. त्यामुळे कारवाई होत नाही. त्यासाठी विशेष विंग तयार करणार का, असा प्रश्न आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. देशात हिंदूंची संख्या घटल्याची आकडेवारी त्यांनी वाचून दाखवली. हिंदूंची लोकसंख्या १९५१ मध्ये ८४.१ टक्के होती. २०११ मध्ये ५ टक्यांनी घटली तर ७९.८० टक्के लोकसंख्या राहिली.

