पुणे, दि. 9: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्याअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका व्यक्तीवर मंगळवारी (8 जुलै रोजी) स्थानबद्धेची कारवाई करुन त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील दिनेश पांडुरंग तांबे हे वारंवार अवैध हातभट्टी दारु निर्मिती हे घातक मद्य तयार करुन विक्री करतांना आढळून आल्यानंतर त्यांच्याकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी, पुरंदर यांनी दोन वर्षाच्या कालावधीकरिता चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले. त्यांनतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न करता वारंवार मानवी आरोग्यास घातक रसायन तयार करीत असल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आले होते. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, भरारी पथक क्र. 2 कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देऊन श्री. तांबे यांच्यावर एका वर्षाकरिता स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
हडपसर विभागाचे उपअधीक्षक उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अशोक शितोळे, विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक दिनेश सूर्यवंशी, किरण पाटील, रामलिंग भांगे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक स्वप्नील दरेकर आदींचा सहभागी होते.
महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंधपत्राचे उल्लंघन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारचे अवैध मद्य विक्री केल्यास त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करुन थेट कारागृहात रवानगी करण्यात येईल, असेही श्री. कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

