“लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे”– डॉ. नीलम गोऱ्हे
सांगली, ९ जुलै २०२५ : करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे की, आरोपींवर कठोर आणि तातडीची कारवाई होणे अत्यावश्यक आहे. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले आहेत की, या प्रकरणातील संपूर्ण साक्षी, फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा असे सर्व आवश्यक तपशील गोळा करून दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात सादर करण्यात यावा. यासोबतच त्यांनी सरकारी वकिलांमार्फत मागणी करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात वर्ग करण्याची शिफारसही करण्याचे निर्देश दिले.
या प्रकरणात कोणताही राजकीय, सामाजिक किंवा स्थानिक दबाव येऊ नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. तपासात पारदर्शकता राखली जावी आणि पीडित कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती देऊन त्यांचा विश्वास जिंकण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “अशा घटना केवळ गुन्हा नसून समाजाच्या मानसिकतेवर ओरखडा आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर लैंगिक शोषणविरोधी कायदे आणि POCSO कायद्याबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी जिल्हा प्रशासनाला सामाजिक जागरूकता उपक्रम तातडीने राबवण्याचे आवाहन केले.
शेवटी, आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता टाळण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात ठोस भूमिका मांडावी, जेणेकरून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा, असेही त्यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.

