पुणे-पुणे जिल्ह्यातील पश्चिम रिंग रोड प्रकल्पाच्या पॅकेज ३ व ४ अंतर्गत खडकवासला विधानसभा क्षेत्रातील बहुली, भगतवाडी, सांगरून, मांडवी बुद्रुक, वरदाडे, मालखेड, खामगाव मावळ, घेरा सिंहगड, कल्याण आणि राठवडे या गावांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्प कामांदरम्यान शेतकऱ्यांच्या जमिनींसंदर्भातील अडचणी, प्रशासनाकडून दुर्लक्ष, आणि पर्यावरण व सुरक्षा नियमांचे उल्लंघन या गंभीर बाबी आज विधानसभेत उपस्थित करण्यात आल्या.
आमदार भिमराव (अण्णा) तापकीर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे हे प्रश्न विधानसभेत मांडले. त्यांनी आपल्या भाषणात पुढील मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधले:
परवानगीशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असून पर्यावरण नियमांचा भंग होत आहे.
गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन सुरू असून महसूल विभाग व एमएसआरडीसीकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाई, फेरमोजणी, व दस्त दुरुस्तीचे प्रश्न प्रलंबित असून शेतकऱ्यांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत आहेत.
वाहतूक सुरक्षेसंदर्भात कोणतीही तांत्रिक उपाययोजना राबविली जात नाही, ज्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत.
एमएसआरडीसीच्या अभियंत्यांकडून देखरेख व नियंत्रणाचा अभाव आहे, यामुळे बेजबाबदारपणे कामे सुरू आहेत.
या गंभीर विषयावर सरकारकडून प्रभारी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. दादाजी भुसे यांनी उत्तर दिले. त्यांनी विधानसभेत आश्वासन दिले की, पालकमंत्री तसेच नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन संपण्यापूर्वी विशेष बैठक आयोजित करून या प्रश्नांवर निर्णय घेतला जाईल.

