महावितरण व महापारेषण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाला यश
पुणे, दि. ९ जुलै, २०२५ – महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत रविवारी (दि. ६) झालेला बिघाड बुधवारी (दि.९) दुपारी १२.४० वाजता दुरुस्त करण्यात यश आले असून, हिंजवडीसह परिसरातील सर्व उद्योगांचा वीजपुरवठा पूर्वपदावर आला आहे. दरम्यान महापारेषणचा बिघाड दुरुस्त होईपर्यंत महावितरणने युद्धपातळीवर अहोरात्र मेहनत घेत सर्व नागरीभागांचा व बहुतांश उद्योगांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु केल्याने दिलासा मिळाला होता. आता एकुणच सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्याने उद्योगांसह पुणेकरांचा व महावितरणचाही ताण कमी होण्यास मदत मिळाली आहे.
हिंजवडी व पेगासस २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी महापारेषण कंपनीने रविवारी सकाळी ११ वाजता संबंधित उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा बंद केला होता. दुरुस्तीचे काम आटोपल्यानंतर रविवारी दुपारी २.१० वाजता इन्फोसिस ते पेगासस उपकेंद्राला येणाऱ्या अतिउच्च्दाब वाहिनीत हिंजवडी मेट्रो स्थानकाजवळ बिघाड झाला आणि विजेची आपत्कालिन परिस्थिती उद्भवली. या दोन मोठ्या उपकेंद्रांमुळे येथून निघणाऱ्या २५ उच्चदाब वाहिन्यांवरील ५२ हजार लघुदाब ग्राहक, इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन अतिउच्चदाब ग्राहकांसह ९१ उच्चदाब ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
महापारेषणच्या बिघाड दुरुस्तीसाठी लागणारा कालावधी मोठा असल्याने महावितरणने पर्यायी मार्गाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यावर भर दिला. सोमवारी पहाटे ४ पर्यंत सर्व ५२ हजार लघुदाब ग्राहक सुरु केले. सोमवारी सायंकाळपर्यंत केवळ ३५ उच्चदाब ग्राहक शिल्लक होते. मंगळवारी त्यातील २६ सुरु केले. तर १० मोठ्या उद्योगांना चक्राकार पद्धतीने ५ तास वीजपुरवठा केला. जवळपास ६३ मेगावॅटचा भार इतरत्र वळविण्यात यश आले. अपवाद फक्त नेक्सट्रा कंपनीचे दोन ग्राहक राहिले. या दोन ग्राहकांना जवळपास २५ मेगावॅटची गरज होती. सरते शेवटी बुधवारी दुपारी १२.४० वाजता नेक्ट्रासह सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळित झाला आहे.
महापारेषणचे संचालक (संचालन) सतीश चव्हाण यांनी देखील मुंबईहून पुण्यात तळ ठोकला होता. तर महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, महापारेषणचे मुख्य अभियंता अनिल कोलप, महावितरणचे अधीक्षक अभियंते सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, महापारेषणचे विठ्ठल भुजबळ यांचेसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणा, एजन्सीस, अतिरिक्त मनुष्यबळ कामी लावून वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करणे सोबतच बिघाड दुरुस्त करण्यावर भर दिला. परिणामी मोठ्या संकटावर मात करणे वीज यंत्रणेला शक्य झाले.
वीज कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे वीज संकटावर मात
महापारेषणचा बिघाड मोठ्या स्वरुपाचा होता. बाधित उपकेंद्रातील विजेची मागणी पाहता इतर उपकेंद्रातून वीजपुरवठा पर्यायी मार्गाने वळविणे हे मोठे अवघड काम होते. परंतु, महावितरणच्या व एजन्सीजच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर आम्ही संकटावर मात केली. दरम्यानच्या काळात सर्व वीजग्राहकांनी संयम दाखवत महावितरणला सहकार्य केले.
सुनील काकडे,
मुख्य अभियंता, महावितरण, पुणे परिमंडल
घटनाक्रम
· रविवार दि. ६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ – महापारेषणने नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद केला.
· रविवारी दुपारी २.१० वाजता – महापारेषणच्या २२० केव्ही इन्फोसिस ते पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड
· रविवारी संध्याकाळी १० ते सोमवारी पहाटे ४ पर्यंत – ५२ हजार लघुदाब ग्राहकांचा व काही उद्योगांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु करण्यात यश
· सोमवारी दुपारीपर्यंत- ९१ बंद ग्राहकांपैकी ७६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु
· सोमवारपासून – १० मोठ्या उच्चदाब ग्राहकांना ५ तास चक्राकार वीजपुरवठ्याचे नियोजन
· मंगळवार दिवसभर – ९ उच्चदाब व २ अतिउच्चदाब (नेक्सट्रा१ व २) वगळता उर्वरित सर्व सुरु
· बुधवारी दु. १२.४० – मूळ बिघाड दुरुस्त करण्यात यश, सर्व वीजपुरवठा सुरळीत.

