मुंबई: वडगावशेरी मतदारसंघातील येरवडा, विश्रांतवाडी व कळस परिसरात दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा प्रश्न गेल्या ३५–४० वर्षांपासून कायम असून यावर आता कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना पठारे यांनी सांगितले, की “दरवर्षी या भागांमध्ये पावसाचे पाणी घरांमध्ये घुसते. सुमारे ६५० घरे पुराच्या सावटाखाली राहत असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. त्यामुळे या घरांचे पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करणे गरजेचे आहे.”
या मुद्द्यावर उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, वडगावशेरी मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, त्यामध्ये पूरस्थितीवरील उपाययोजनांचाही समावेश आहे. या निधीपैकी ७० कोटी रुपये दोन दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहेत. पुनर्वसनासंदर्भातही शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, आमदार बापूसाहेब पठारे यांनी खराडी येथील सर्व्हे क्रमांक ५३ व ५४ मधील एक्झिबिशन ग्राउंड म्हणून आरक्षित असलेल्या जागेची मालकी पुणे महानगरपालिकेकडे मागील १० वर्षापासून असताना तसेच ७/१२ वरही नाव असूनही ती जागा एका खासगी उद्योजकाकडे कशी हस्तांतरित झाली? असा थेट सवालही सभागृहात उपस्थित केला. “जर उद्योजकाला आरक्षित जागा हस्तांतरित होऊ शकते, तर सामान्य शेतकऱ्यांनाही आरक्षण वगळून देणार का?” असा सवालही त्यांनी केला. यावरही मंत्री सामंत यांनी विषयाची सखोल तपासणी केली जाईल, असे उत्तर दिले.

