मुंबई- मीरा भाईंदर येथे आज झालेल्या राड्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सशक्त लोकशाहीत प्रत्येक भारतीयाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, असे त्या मनसेच्या मराठी स्वाभिमान मोर्चात झालेल्या गोंधळावर भाष्य करताना म्हणाल्यात.
सुप्रिया सुळे यांनी आज राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मीरा भाईंदरमध्ये उद्बवलेल्या परिस्थितीसाठी सर्वस्वी मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहेत. आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्रात आहेत. सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही सुरू आहे. अशावेळी राज्याचे गृहखाते काय करत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार सशक्त लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. कारण ही लोकशाही आहे दडपशाही नव्हे.
आजच्या सगळ्या गोंधळाला केवळ गृहखाते व मुख्यमंत्री जबाबदार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदा वेगळे आणि दुसऱ्यांदा काही वेगळेच बोलतात. ही मोठी अडचण आहे. भाजप हा एक सुसंस्कृत पक्ष असल्याचे मला वाटत होते. पण दुर्दैवाने गत काही दिवसांमध्ये त्यांचे वागणे ओरिजनल भारतीय जनता पक्षाला शोभणारे नाही. हे न शोभणारे कल्चर भाजपमध्ये कुठून आले? ही लोकशाहीला शोभणारी गोष्ट नाही. अर्थातच या स्थितीला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे.
अजित पवार म्हणतात हिंदीची सक्ती मी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट म्हणतो ही सक्ती आम्हीही केली नाही. मग याला जबाबदार कोण? हिंदीची सक्ती भाजपने केली. आमचा हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेला विरोध नाही. पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. कोणत्याही भाषेची सक्ती करू नका एवढेच आमचे म्हणणे आहे, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांना यावेळी विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी आपल्या भावना अर्थमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. आमच्या मागण्यांचे सर्वकाही तुमच्या भावाच्या म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हातात आहे. भाऊ बहिणीचे ऐकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावाच्या कानावर आमच्या मागण्या घाला, असे ते म्हणाले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा भाऊ राज्याचा अर्थमंत्री असला तरी सरकारचा अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस हेच सर्व मुद्यांवर निर्णय घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हाय हाय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

