मुंबई-मराठी माणसांना उचलून आपटण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबे यांना तुडवायचे की त्याच्याकडून तुडवून घ्यायचे हे ठरवा, असा तिखट सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना केला आहे. निशिकांत दुबे यांनी दिलेली धमकी कोणत्याही एका व्यक्तीसाठी नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री व आमदारांसाठी आहे, असे त्या म्हणाल्या.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना महाराष्ट्राचे देशाच्या विकासात योगदान काय? असा अवमानकारक सवाल उपस्थित केला होता. राज व उद्धव ठाकरे यांनी बिहार व उत्तर प्रदेशात येऊन दाखवावे तिकडे त्यांना उचलून आपटतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांना उपरोक्त सवाल केला आहे.
निशिकांत दुबे यांची धमकी केवळ एखाद-दुसऱ्या व्यक्तीसाठी नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक मंत्री व आमदारासाठी आहे. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मराठी आहेत. ही धमकी त्यांनाही आहे. दुबेची धमकी महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच मंत्री व भाजपाईंसाठी आहे. त्यांनाही त्याने तुडवायची भाषा केली आहे. आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचे की निशिकांत दुबेला तुडवायचे हे भाजपच्या मराठी आमदार व खासदारांनी ठरवावे, असे सुषमा अंधारे सोमवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकशाहीचा उमाळा फुटला होता. महाराष्ट्रात कुणालाही हिंसा करू देणार नाही असे ते म्हणाले होते. तसा अविर्भावही दाखवत होते. मग आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी वापरलेली भाषा कोणत्या शासन पद्धतीत बसते. या प्रकरणी फडणवीस यांची काय भूमिका आहे? भाजप खासदार मराठी माणसाला आपटून मारण्याची भाषा करत आहे. हिंमत असेल तर त्यांनी बाहेर पडावे. मग आम्ही काय करायचे ते करू. पण पहिला वार आम्ही करणार नाही. पण आमच्यावर वार झाला तर तो हात मुळापासून उखडून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला दिलेली धमकी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्वच भाजप नेत्यांसाठी आहे. त्याने तुम्हाला तुडवायची भाषा केली आहे. तुमच्या पाठीला रबर नसेल, कणा असेल, मराठी मान, अभिमान, मराठीचा ताठा व स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेला तुडवायचे की त्याच्याकडून तुडवून घ्यायचे हे ठरवा, असेही सुषमा अंधारे यावेळी बोलताना म्हणाल्या.

