ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या हस्ते सन्मान : शिवगर्जना पथकाचे वाद्यपूजन
पुणे : पारंपरिक वाद्य संगीताचे जतन करणाऱ्या आणि या वाद्यांचे सौंदर्य वादनातून लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या महिला वाद्य वादकांचा सन्मान शिवगर्जना पथकाच्या वतीने करण्यात आला. ज्येष्ठ तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले.
शिवगर्जना पथक पुणे यांच्या वतीने सहकार नगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानात सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय घाटे यांच्या हस्ते वाद्यपूजन झाले. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, शिवगर्जना पथकाचे अध्यक्ष ललित पवार, महेश गोखले, गणेश शिर्के, ओंकार होले, बिंदू ढोलेपाटील यावेळी उपस्थित होते.
संबळ वादक गौरी वायचळ वनारसे, नगारा वादक निकिता लोणकर , सॅक्सोफोन वादक रोहिणी मातापूरकर, ढोल वादक लक्ष्मी कुडाळकर या महिला वादकांचा सन्मान करण्यात आला. तसेच पथकात वादन करणाऱ्या दिव्यांग वादकांचा सन्मान देखील करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचे उपरणे असे सन्मानाचे स्वरूप होते.
विजय घाटे म्हणाले, ढोल ताशा वादन ही पुण्यातील गणेशोत्सवाची परंपरा आहे. शिवगर्जना पथकाने ही परंपरा २४ वर्ष सातत्याने टिकवली आहे. ढोल आणि ताशा याचा एक वेगळा रिदम आहे. त्याची पवित्र अशी धुंदी तयार होते. ताशा वादन करताना त्याची पद्धत पारंपारिक आहे. ते वादन निराळ्या पद्धतीने होऊ शकते त्यातील वेगळेपण शोधा अशी इच्छा यांनी व्यक्त केली.
अण्णा थोरात म्हणाले, पारंपरिक वाद्य हे आपल्या संस्कृतीचे अनमोल ठेवा आहे. त्याचे वादन करणाऱ्या कलाकारांना सन्मान देणे म्हणजे आपल्या लोककलेची जपणूक करणे आहे. शिवगर्जना पथकाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवीत सामाजिक बांधिलकी जपली जाते. ढोल ताशा पथकाला सामाजिक उपक्रमांची जोड देऊन तरुण पिढी समाजकार्यात देखील सक्रिय आहे असेही त्यांनी सांगितले.

